Vinayak Mete Bodyguard Accident: विनायक मेटेंच्या गंभीर जखमी अंगरक्षकाला पुण्यात हलविले; कारण काय? शिंदेंनीही केली विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 02:33 PM2022-08-15T14:33:18+5:302022-08-15T14:41:44+5:30
Vinayak Mete Bodyguard Accident: अपघात झाल्यानंतर सुमारे तासभर कोणतीच मदत मिळाली नसल्याचा आरोप चालकाने केला आहे. अपघातानंतर मी विनायक मेटेंशी बोललो, त्यांनी आपण ठीक असल्याचे सांगितले होते, असेही हा चालक सांगत होता. तेव्हा ढोबळे देखील शुद्धीत होते.
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या कारला शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. यामध्ये मेटे यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पुढील सीटवर बसलेला अंगरक्षक जबर जखमी झाला आहे. चालक पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी केली जात आहे.
अपघात झाल्यानंतर सुमारे तासभर कोणतीच मदत मिळाली नसल्याचा आरोप चालकाने केला आहे. अपघातानंतर मी विनायक मेटेंशी बोललो, त्यांनी आपण ठीक असल्याचे सांगितले होते, असेही हा चालक सांगत होता. परंतू, सव्वातासाने हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर पनवेल एमजीएमच्या डॉक्टरांनी मेटेंना मृत घोषित केले होते. या साऱ्या प्रकारावरून वाद सुरु असताना विनायक मेटेंचे बॉडीगार्ड पोलीस राम ढोबळे यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
ढोबळे यांच्या कुटुंबीयांनीच तशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ढोबळे कुटुंबीयांशी फोनवरून प्रकृतीची विचारपूस केली होती. यावेळी त्यांनी राम ढोबळे यांना पुण्याला हलविण्याची मागणी केली होती. ही विनंत शिंदे यांनी मान्य करून पुढची व्यवस्था केली. ढोबळे कुटुंबीयांना पनेवपेक्षा पुणे हे सोईचे वाटत होते, यामुळे ढोबळेंना पुण्याला हलविण्यात आल्याची शक्यता आहे. ढोबळे यांच्या पायाला. पोटाला आणि डोक्याला गंभीर मार लागला आहे. टीव्ही ९ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रात्री ११ च्या सुमारास ढोबळे यांना कार्डिओ अॅम्बुलन्समधून पुण्याला आणण्यात आले. त्यापूर्वी ढोबळे यांना एवढ्या लांब नेता येईल का, हे पाहण्यासाठी वेगळी डॉक्टरांची टीम एमजीएम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आली होती. या टीमच्या मार्गदर्शनाखाली ढोबळे यांना पुण्याचील रुबी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. ढोबळे यांच्या उपचाराचा सर्व खर्च करणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिला आहे.
ढोबळे हे देखील बीडचेच होते. गेल्या सहा-सात महिन्यांपासून त्यांची ड्युटी विनायक मेटेंचा बॉडीगार्ड म्हणून लावण्यात आली होती. मेटे मुंबईला जात असताना ढोबळे देखील मेटेंसोबत कारमध्ये होते. ते पुढील सीटवर बसले होते, त्याच बाजुला मेटेंची कार ट्रकला धडकली होती.