उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका महाराष्ट्रात चालू देणार नाही : विनायक मेटे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 10:40 AM2020-02-09T10:40:16+5:302020-02-09T10:44:59+5:30
दोन भूमिका घेणार हे सरकार पडले पाहिजे आणि समाजाला न्याय मिळाला पाहिज. यासाठी आपल्याला काम करायचे असल्याचे सुद्धा यावेळी मेटे म्हणाले.
मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटेंनीछत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीचा नुकताच राजीनामा दिला आहे. त्यांनतर मेटे आता ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. शिवजयंतीच्या तारखेच्या मुद्यावरून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांची दुटप्पी भूमिका या महाराष्ट्रात चालू देणार नाही, अशी टीका मेटे यांनी केली.
शिवसंग्राम पक्षाच्या 18 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मेटे म्हणाले की, सर्वत्र 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करतात त्यांना ही तारीख मान्य नाही. शिवजयंतीची 19 फेब्रुवारी तारीख मान्य नसल्यास मुख्यमंत्र्यांना गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. तर त्यांची दुटप्पी भूमिका या महाराष्ट्रात चालू देणार नाही, असेही मेटे म्हणाले.
निवडणुकीत लोकांना आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे त्याकडे लक्षही द्यायचे नाही असा प्रकार या सरकारने चालवला आहे. त्यामुळे दोन भूमिका घेणार हे सरकार पडले पाहिजे आणि समाजाला न्याय मिळाला पाहिज. यासाठी आपल्याला काम करायचे असल्याचे सुद्धा यावेळी मेटे म्हणाले.