Vinayak Mete Death: विनायक मेटेंचे अपघाती निधन; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 08:04 AM2022-08-14T08:04:51+5:302022-08-14T08:09:55+5:30
Vinayak Mete Passed Away: एका अज्ञात वाहनावर मागून मेटेंची गाडी धडकल्याचे चालकाने सांगितले. अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेटे यांना मुंबईला हलविण्याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. मात्र, डॉक्टरांनी त्यांना निधन झाल्याची कल्पना दिली. डॉ. धर्मांग यांनी मेटे यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एमजीएमला पोहोचणार आहेत. विनायक मेटेंच्या पत्नीलाही याबाबत कळविण्यात आले आहे. एका अज्ञात वाहनावर मागून मेटेंची गाडी धडकल्याचे चालकाने सांगितले. अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. अपघाताचे वृत्त समजताच भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पोहोचले आहेत. मेटे यांची कार बीडकडून मुंबईकडे येत होते. या दरम्यान, मेटेंच्या कार चालकाने गंभीर आरोप केले आहेत. राम ढोबळे पोलीस बॉडीगार्ड गंभीर जखमी आहेत.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांचा अपघात झाला. यानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंचा चालक एकनाथ कदम यांनी केला. त्यांनी मी रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत. मला मुका मार लागला आहे. गार्डना थोडा मार बसला आहे. एअरबॅग होत्या म्हणून आम्ही वाचलोय, असे कदम म्हणाले.
छोटा टेम्पो चालकाने मदत केली. दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हलल्याचे चालकाने सांगितले. त्याच्यानंतर आम्हाला रुग्णालयात आणले गेले, असे कदम यांनी सांगितले.