शिवस्मारकच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करा; विनायक मेटेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 10:32 AM2018-10-24T10:32:45+5:302018-10-24T10:38:01+5:30
संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा
मुंबई: शिवस्मारकाच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून कंत्राटदार आणि सल्लागारांनी स्मारकाच्या रचनेत मनमानीपणे बदल केले असा गंभीर आरोप मेटे यांनी पत्रातून केला आहे. या प्रकरणाची चौकशी न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
शिवस्मारकाच्या रचनेत अनेक बदल करण्यात आले. सल्लागार आणि कंत्राटदारांनी संगनमत करुन रचनेत मनमानीपणे बदल केल्याचा आरोप मेटे यांनी पत्रातून केला आहे. मुख्यमंत्र्यांना आणि शिवस्मारक कृती समितीला अंधारात ठेवून हे बदल केल्याचा आरोपदेखील मेटे यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. या प्रकरणाची चौकशी न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शिवस्मारकाची उंची 210 मीटरवरुन 212 मीटर करण्यात आली. यामुळे स्मारकाचा खर्च 81 कोटींनी वाढत असल्याचं दाखवण्यात आलं. हे 81 कोटी रुपये कोणाच्या परवानगीनं वाढवण्यात आले?, असा प्रश्न मेटे यांनी पत्रातून विचारला आहे. कंत्राटदार आणि सल्लागार कंपनीच्या मनमानी बदलांमुळे भविष्यात आर्थिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होतील, असं मेटे यांनी पत्रात नमूद केलं आहे. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून सुरू असलेल्या या सर्व बदलांची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.