विनायक मेटेंचा शिवसेनेशी घरोबा!
By admin | Published: January 9, 2017 05:08 AM2017-01-09T05:08:37+5:302017-01-09T05:08:37+5:30
भाजपाकडून वारंवार डावलले जात असल्याने नाराज असणारे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मुंबई : भाजपाकडून वारंवार डावलले जात असल्याने नाराज असणारे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही सदिच्छा भेट होती,असा खुलासा मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
आगामी काळात राज्यातील २६ जिल्हा परिषदा आणि ११ महापालिकांसाठी राजकीय दंगल रंगणार आहे. भाजपाने आक्रमकपणे राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात केली आहेत. मित्रपक्ष शिवसेनेसह घटकपक्षांना विश्वासात घेतले जात नसल्याची भावना या पक्षांकडून वारंवार व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मेटे यांनी मातोश्री गाठल्याने तर्कवितर्क लढविण्यात आले. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष असतानाही आपणास भूमिपूजन समारंभात सन्मानाची वागणूक मिळाली नाही, अशी नाराजी मेटे यांनी व्यक्त केली होती.
मातोश्रीच्या भेटीसंदर्भात मेटे म्हणाले की, शिवसेना व भाजपाने सोबत निवडणुका लढवाव्यात आणि आम्हालाही सोबत घ्यावे, अशी आम्हा सर्व घटकपक्षांची भावना आहे. मात्र आम्हाला सोबत घेतले नाही, तर जिथे कुठे शक्य असेल तिथे आम्हाला निवडणुका लढवाव्याच लागतील. आगामी निवडणुकांमध्ये जिथे
आमची ताकद आहे, तिथे जागा द्या, अन्यथा आम्हालाही वेगळा पर्याय निवडावा लागेल, असा प्रस्ताव भाजपाला आम्ही दिला आहे. किमान महाराष्ट्रातील जे विषय आहेत त्याबाबत मित्रपक्षांना विश्वासात घेऊन सन्मानाची वागणूक भाजपाने दिली पाहिजे. भाजपा कसा मानसन्मान ठेवतो, हे महाराष्ट्राला माहित आहे, असा टोलाही मेटे यांनी लगावला. (प्रतिनिधी)