मेटे यांच्या घातपाताचा ३ ऑगस्ट रोजी प्रयत्न? कार्यकर्त्याचा दावा, कथित क्लिप व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 07:48 AM2022-08-17T07:48:50+5:302022-08-17T07:49:11+5:30
Vinayak Mete : विनायक मेटे यांच्या अपघाची मृत्युची चौकशी सुरू असतानाच अण्णासाहेब मायकर नामक कार्यकर्त्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघात झाला नसून तो घातपात आहे, असा दावा समर्थक आणि नातेवाइकांमधून केला जात असताना आता एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात एका कार्यकर्त्याने ३ ऑगस्टला सुद्धा मेटे यांच्या गाडीचा पाठलाग झाल्याचे सांगितले आहे.
विनायक मेटे यांच्या अपघाची मृत्युची चौकशी सुरू असतानाच अण्णासाहेब मायकर नामक कार्यकर्त्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात मायकर सांगतात की, ३ ऑगस्ट रोजी मेटे यांच्या गाडीचा रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो आणि पांढऱ्या रंगाच्या गाडीने शिक्रापूरजवळ (जि. पुणे) पाठलाग केला होता. गाडीत पाच ते सहा लोक बसलेले होते. मागे-पुढे गाडी करीत होते, तर टेम्पो हा आमच्या गाडीला पुढे जाऊ देत नव्हता, असा दावा त्यांनी केला आहे.
३ ऑगस्ट रोजीच्या घटनेची माहिती घेऊन ती गाडी आणि ही गाडी सारखीच आहे का, याची तपासणी व्हावी.
- ज्योती विनायक मेटे