जिल्ह्यातील विरोध मावळणार ? विनायक मेटेंचा मंत्रीपदाचा मार्ग होणार मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 01:06 PM2019-10-31T13:06:29+5:302019-10-31T13:07:55+5:30
पंकजा मुंडे या मेटेंना विरोध करण्यात आपली उर्जा वाया घालविण्याऐवजी स्वत:च्या स्थिरतेसाठी त्याचा उपयोग करू घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेटेंना या टर्ममध्ये मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या घटलेल्या जागा आणि दिग्गज मंत्र्यांचे झालेले पराभव यामुळे मित्रपक्षांना पुन्हा एकदा बळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेला मंत्रीपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
भाजपकडून मेटेंना पाच वर्षे मंत्रीपदासाठी ताटकळत ठेवून शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावर त्यांची बोळवण करण्यात आली होती. एकाच जिल्ह्यात दोन मंत्रीपदे देण्यावरून भाजपमध्येच एकमत नसल्यामुळे ही स्थिती होती. परंतु, आता बीड जिल्ह्यात भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी भाजपच्या चिन्हावर लढलेले मेटेंचे तीन समर्थक निवडून आले आहेत.
पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देण्यासंदर्भात काहीही हालचाली नाही. मंत्रीपदासाठी मुंडे यांना पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांचा मंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे, विधान परिषद दिल्यानंतर मंत्रीपद नाही, असा नियमच भाजपमध्ये आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून निवडणूक लढवावी लागली आहे.
अशा स्थितीत पंकजा मुंडे या मेटेंना विरोध करण्यात आपली उर्जा वाया घालविण्याऐवजी स्वत:च्या स्थिरतेसाठी त्याचा उपयोग करू घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेटेंना या टर्ममध्ये मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.