‘विंदा जीवनगौरव’ हा तर विनोदाचा सन्मान!
By admin | Published: February 28, 2015 04:47 AM2015-02-28T04:47:58+5:302015-02-28T04:47:58+5:30
ग्रामीण व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले. ग्रामीण माणसाचा इरसालपणा लिहिला आणि तो कथाकथनातून सांगितला.
मुंबई : ग्रामीण व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले. ग्रामीण माणसाचा इरसालपणा लिहिला आणि तो कथाकथनातून सांगितला. मराठी भाषा दिनी विंदा करंदीकरांसारख्या सहृदय कवीच्या नावाने होणारा सन्मान म्हणजे त्या विनोदाचा सन्मान आहे, अशी कृतज्ञ भावना ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी व्यक्त केली.
मराठी भाषा विभाग आणि राज्य संस्कृती मंडळाच्या वतीने २०१३ सालच्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण आज प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात झाले. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते मिरासदार यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी मिरासदार म्हणाले की, विंदा यांना मी केवळ एक कवी म्हणून नव्हे, तर चांगला मनुष्य म्हणून ओळखतो. त्यांचाशी व्यक्तिश: स्नेह होता. मराठी भाषा दिनी त्यांच्या नावाचा सन्मान मिळाला याचा आनंद जास्त आहे, अशी भावना मिरासदारांनी व्यक्त केली. तर, रामदास भटकळ यांच्या हस्ते केशव भिकाजी ढवळे प्रकाशनास श्री. पु. भागवत पुरस्काराने सन्मानित् ा करण्यात आले. ढवळे प्रकाशनचे अंजनेय ढवळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ११४ वर्षे वाचकांची सेवा केल्याचा सन्मान आहे, असे अंजनेय ढवळे म्हणाले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास थोडा विलंब झाला आहे. मराठी भाषा दिनी तो जाहीर होण्याची अपेक्षा होती. परंतु येत्या २०-२५ दिवसांत तशी घोषणा नक्की होईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले. (प्रतिनिधी)