विंदा करंदीकर जन्मशताब्दीवर्ष: स्वेदगंगेपासून मृदगंधपर्यंत 'सतत देत राहाणारा' कवी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 01:28 PM2018-08-23T13:28:14+5:302018-08-23T13:36:52+5:30
विंदांना 2006 साली 39 वा ज्ञानपिठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना केशवसुत पुरस्कार, सोव्हिएट लँड नेहरु लिटररी अॅवॉर्ड, कबिर सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले होते.
मुंबई- गोविंद विनायक करंदीकर असं मूळ नाव असलं तरी त्यांना सर्व वाचकांनी आणि कविताप्रेमींनी विंदा करंदीकर अशाच नावाने ओळखलं. 23 ऑगस्ट 1918 रोजी सिंधुदुर्गातील एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या विंदांचे हे जन्मशताब्दी वर्ष. आयुष्यभरात एक शिक्षक, कवी, लेखक, अनुवादक आणि साहित्य आस्वादक अशा निरनिराळ्या भूमिका पार पाडणाऱ्या विंदांच्या अनेक कविता आजही आपल्या ओठांवर आहेत.
विंदांना 2006 साली 39 वा ज्ञानपिठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना केशवसुत पुरस्कार, सोव्हिएट लँड नेहरु लिटररी अॅवॉर्ड, कबिर सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले होते. स्वेदगंगा, मृदगंध, जातक, विरुपिका, धृपद हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. राणीचा बाग, सश्याचे कान आणि परी गं परी अशी त्यांनी लहान मुलांसाठीही पुस्तकं लिहिली. स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.
आज जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या अनेक गाजलेल्या कवितांचे स्मरण करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.
विंदांची देणाऱ्याने देत जावे ही एक सर्वमान्यता लाभलेली सुप्रसिद्ध कविता आहे.
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावेत
याबरोबरच समाजाच्या एकूण स्थितीवर भाष्य करणारी त्यांची सब घोडे बारा टक्के ही कविता आजही तितकीच विचार करायला लावणारी आहे..
जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट; कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!
गोड गोड जुन्या थापा (तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के!
जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी) ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता; पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार; याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!
सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा?
कोणी तिऱ्या कोणी छक्के; सब घोडे बारा टक्के!
समाजातील संवेदनहीन परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी माझ्या मना बन दगड या कवितेतून भावना व्यक्त केल्या होत्या...
हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव!
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड!
हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो!
हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य!
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद!
बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे निःश्वास
मरणाऱ्याला देतील श्वास?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज!
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड
एटू लोकांचा देशमध्ये ते लहान मुलांच्या अद्भूत विश्वात घेऊन जातात. आज या कवितांना पाच ते सहा दशके झाली असली तरी आजही या कविता सर्वांच्या स्मरणात आहेतच त्याहून त्या पुन्हापुन्हा वाचाव्याश्या वाटतात.
‘तिबेटाच्या
जरा खाली
हिमालयाच्या
जरा वर
एटू लोकांचा
अद्भुत देश
प्रत्येकाजवळ
उडते घर,
टिंग म्हणता
येते खाली,
टुंग म्हणता
जाते वर..’
हे एटू लोक कसे असतात? तर,
‘एटू असतात
गोरे, गोरे,
एटू असतात
छोटे, छोटे.
पण पुरुषाच्या
पाठीमागे
शेपूट असते
फार मोठे.
तेच फिरवून
डोक्यावरती
एटू बांधतात
छान फेटे..’