‘आज से विनेश की दंगल शुरू !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2016 09:25 PM2016-05-07T21:25:12+5:302016-05-07T21:25:12+5:30

कुस्तीच्या आखाड्यात शड्डू ठोकण्याची मक्तेदारी केवळ पुरुषांचीच राहिली नाही, हे सिद्ध करण्यासाठी ‘भाक-या थापणारे’ हात ‘मोळीचा डाव’ही टाकू लागले

Vinesh from today begins the riot! | ‘आज से विनेश की दंगल शुरू !’

‘आज से विनेश की दंगल शुरू !’

Next
>सचिन जवळकोटे -
(लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)
सातारा, दि. 07 - ‘लाल  मातीच्या फडात अंग घुसळावं मर्दानं... अन् काट्याकुट्यानं भरलेल्या चुलीसमोर भाक-या थापाव्यात बाईनं’... ही आजपर्यंत आपल्या संस्कृतीची साधी सरळसोट परंपरा; परंतु गेल्या पन्नास वर्षांत जमाना बदलला. कुस्तीच्या आखाड्यात शड्डू ठोकण्याची मक्तेदारी केवळ पुरुषांचीच राहिली नाही, हे सिद्ध करण्यासाठी ‘भाक-या थापणारे’ हात ‘मोळीचा डाव’ही टाकू लागले. हरियाणाच्या कट्टर पुरुषप्रधान राज्यात तर शेकडो महिला कुस्तीपटू तयार झाल्या. ‘भिवानी’च्या गीता फोगटनं यापूर्वी गावाचं नाव मोठ्ठं केलं तर आता तिचीच चुलत बहीण विनेश देशाचं नाव मोठं करू लागलीय. ‘रिओ ऑलिम्पिक’च्या पात्रता फेरीत विजय मिळवून आता पुढचं ध्येय गाठायला निघालीय.
 
गेल्यावर्षी ‘लोकमत’च्या ‘दिपोत्सव’साठी या फोगट भगिनींची कहाणी टिपायला मी थेट हरियाणा गाठलं होतं. ‘भिवानी’त मुक्काम केला होता. त्यावेळी डोळ्यासमोर होती फक्त गीता. त्यानंतर बबिता. अन् मग कुठंतरी शेवटी विनेश.. मात्र हीच सर्वात धाकटी विनेश आज ‘रिओ ऑलिम्पिक’पर्यंत मजल गाठेल, हे तेव्हा कुणाच्याच ध्यानीमनीही नव्हतं. विनेश अन् तिच्या इतर पाच बहिणींनाही कुस्तीच्या मैदानात उतरवणा-या महावीर फोगट नामक मल्ल पित्यावर आमीरचा नवा चित्रपटही येतोय. नाव त्याचं ‘दंगल’. आता या पिक्चरच्याच घोषवाक्यात बोलायचं झालं तर ‘आज से विनेश की दंगल शुरू !’
 
 ‘जिन्द’ लगतचा जिल्हा म्हणजे ‘भिवानी’. याच जिल्ह्यात ‘बलाली’ नामक इवल्याशा गावात विनेश फोगटचं कुटुंब राहतय. महावीर यांना चार मुली अन् एक मुलगा. गीता, बबिता, रितू, संगीता अन् मुलगा दुष्यंत. भावाच्या दोन मुली विनेश अन् प्रियंका याही कुस्तीच्या तालमीतच रमलेल्या. मी त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा महावीर सांगत होते, ‘मेरे दादाजी पहेलवान. पिताजी पहेलवान... और मैं भी पहेलवान. मुझे भैसों का बहुत शौक. पुरे देश मे घुमकर हर जगह की नयी-नयी भैंसे मैंने मेरे घर में लायी हैं. दूध, दही, मख्खन और घी चौबीस घंटे हमरे घर में. जब गीता और विनेश छोटी थी तब लड़कों जैसे घुमती थी. मेरे साथ घर के पिछडेवाले छोटे कमरे में प्रॅक्टिस करती थी. उसकी लगन देखकर मैंने तय किया कि मेरी बच्ची भी कुश्ती सिखें!’
घरातल्या झाडून सर्व मुलींना कुस्तीच्या मैदानात उतरविणारे महावीर तसे अशिक्षित. अडाणी. बाहेरच्या जगाशी त्यांचा जास्त संपर्क न आलेला. सकाळ-संध्याकाळी तालमीत घुमायचं... अन् दिवसभर शेतात राबायचं; हा त्यांचा दिनक्रम ठरलेला. मात्र, त्यांच्या प्रोत्साहनातूनच स्वयंपाक घरातलं लाटणं बाजूला सारून त्यांच्या पोरीबाळींनी आखाड्यात शड्डू ठोकला अन् त्याला सा-या जगानं दाद दिली, ही गोष्ट तशी भारतासाठी नवलाईचीच. 
 
.. घरी दूध-दह्याचा जणू धबधबाच. तोंडाला लागलेलं लोणी पुसत गीता अन् विनेश रोज जोर-बैठका काढू लागली. तिचं बघून बाकीच्याही बहिणी हळूहळू व्यायामात रमू लागल्या. शाळेतल्या कुस्तीत विनेश मैदान मारू लागली. तिचं हे यश पाहून तालुका-जिल्हा पातळीवरच्या स्पर्धेतही तिला उतरविलं गेलं. पाहता- पाहता हरियाणा राज्यात तिच्या नावाचा बोलबाला झाला. कधी ‘बगलडूब’ तर कधी ‘कलाजंग’ डावात समोरच्याला चितपट करणा-या विनेश अन् बबितानं २०१४ च्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत वेगवेगळ्या वजन गटांमध्ये सुवर्ण पदक पटकावली.
‘कॉमनेवल्थ’मध्ये ही दोन वेळा ‘गोल्ड’ पटकाविणा-या तिच्या गीतादिदीनं ऑॅलिम्पिकपर्यंत मजल मारली होती. २०१२ च्या लंडन ऑॅलिम्पिकमध्ये कुस्ती खेळणारी गीता ही पहिली भारतीय महिला खेळाडू. पण ती पदक जिंकू शकली नाही. आता विनेशही गीताच्या पावलावर पाऊल टाकत मुसंडी मारते आहे.  दोन वर्षांपूर्वीच्या कॉमनवेल्थ गेमसाठी बबिता आणि विनेश ग्लासगोला गेल्या होत्या. लिगामेन्टच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर राहण्याची वेळ आलेली त्यांची गीतादिदी घरी बलालीला होती. या दोघीनी घरी फोन केला. तर पहिली गाठ पापाजीशी पडली. विनेश सांगत होती, ‘और कुछ ना बोले पापाजी. बस्स इतना कहा, की गोल्ड लेके आईयो. मैने कहा, गोल्डही लायेंगे पाप्पाजी... आप चिंता ना करो,’ अशी खात्री देणा-या विनेशने दुस-याच दिवशी ४८ किलो वजनी गटात गोल्ड पटकाविलं. आताही हाच मेसेज असेल कदाचित विनेशला ऑॅलिम्पिकसाठी ! 
 

Web Title: Vinesh from today begins the riot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.