विनोद खन्ना - एक सत्यमेव चिकित्सा

By admin | Published: April 28, 2017 05:31 PM2017-04-28T17:31:32+5:302017-04-28T17:31:32+5:30

एकूणच आणि विशेषतः त्या काळातील हिंदी साचेबद्ध व्यावसायिक चित्रपटांची देखण्या, तगड्या आणि सॉफिस्टिकेटेड व्यक्तिमत्वाच्या स्टारची गरज विनोद खन्नाने पुरेपूर भागवली हे खरंच.

Vinod Khanna - A Satyameva Medical | विनोद खन्ना - एक सत्यमेव चिकित्सा

विनोद खन्ना - एक सत्यमेव चिकित्सा

Next
>-  रेखा देशपांडे
 
सध्याचा काळ हा सत्योत्तर - पोस्ट ट्रुथ – काळ असं म्हटलं जातं. टी. व्ही.च्या वृत्त वाहिन्यांवरच्या वृत्तनिवेदकांना ऐकलं की सत्योत्तर ते हेच अशी खात्री पटू लागते. निमंत्रित व्यक्तीकडून वाहिनीला हवं तेच वदवून घ्यायचा किंवा ती व्यक्ती परखडपणे बोलली तरी आपल्या निवेदनात दामटून त्या व्यक्तीच्या विधानाला उलट करायचा केविलवाणा प्रयत्न अनेकदा तिथे दिसून येतो. प्रश्न पडतो, गौरवग्रंथाचं ठीक आहे. पण इतिहासाचं दस्तावेजीकरण करायचं झालं तर चिकित्सा करायला नको का?  हा प्रश्न पडायला निमित्त झालं ते कालच झालेल्या विनोद खन्नाच्या निधनाचं. 
70 च्या दशकातला एक महत्त्वाचा सिनेस्टार विनोद खन्ना. एकूणच आणि विशेषतः त्या काळातील हिंदी साचेबद्ध व्यावसायिक चित्रपटांची देखण्या, तगड्या आणि सॉफिस्टिकेटेड व्यक्तिमत्वाच्या स्टारची गरज विनोद खन्नाने पुरेपूर भागवली हे खरंच. तत्कालीन तरुणींवर या देखण्या, तगड्या व्यकितमत्वाची छाप निश्चितच पडली होती. तरीही ठेंगण्या राजेश खन्नाच्या लकबींची मोहिनी कॉलेज तरुणींवर अजून रेंगाळत होती, ती इतर कोणत्याही तरुणाच्या प्रभावाला झाकोळून टाकणारी होती आणि धर्मेंद्रच्या ही-मॅन प्रतिमेच्या कटआऊटमागे इतर ही-मॅन पोस्टर्स लपून जात होती. ‘आनंद’ मध्ये अमिताभनं पडद्यावर प्रवेश केला आणि मग ‘जंजीर’पासून तर पडदा व्यापून तो दशांगुळे उरला नव्हे, पडद्यावाहेरच्या जगातही ‘पसरत’च गेला. मी विनोद खन्नाला पहिल्यांदा पाहिला तो 70 साली ‘आन मिलो सजना’ मधला खलनायक म्हणून. त्या आधी दोनच वर्षं तो दोन-तीन चित्रपटांतून आला होता. 70 मध्येच ‘पूरब और पश्चिम’मध्येही त्याची छोटी भूमिका होती. ‘आन मिलो सजना’मध्ये खलनायक म्हणून खरंच तो खूप प्रभावी वाटला. नायकाला आह्वान द्यायचं तर खलनायकाचं व्यक्तिमत्वदेखील प्रभावी असायलाच हवं, तरच दोघांतला संघर्ष विश्वसनीय वाटेल, हे साधं तर्कशास्त्र. एक प्राण सोडला तर हिंदी साचेबद्ध चित्रपटांनी याचा फारसा कधी विचार केला नसावा. (आणि प्राण स्टीरिओटाइप झाल्यामुळे त्याचं ‘दुष्टपण’ त्याच्या देखण्या व्यक्तिमत्वावर प्रेक्षकांनी आणि नायिकेनंही असं काही चिकटवून टाकलं की याला नाकारायचं हे ठरूनच गेलं होतं.) 
विनोद खन्नाच्या रूपात तर्कदृष्ट्या विश्वसनीय वाटावा असा खलनायक आला असं वाटलं. 
चंबळच्या खोऱ्यात हैदोस घालणाऱ्या डाकू व्यक्तिरेखांना केंद्रस्थानी कल्पून संघर्षाच्या कथा हा त्यावेळच्या हिंदी चित्रपटांतला एक हुकमी लोकप्रिय साचा होता. त्यातल्या ‘मेरा गाँव मेरा देश’ मध्येही विनोद खन्ना शोभून दिसला. ‘रेश्मा और शेरा’ आणि ‘कच्चे धागे’ यांतही त्याला डाकूचा वेष मिळाला. खलनायकाच्या भूमिकेकडून नायकाच्या भूमिकेकडे यशस्वी प्रवास हे त्याच्या कारकीर्दीचं मोठं वैशिष्ट्य. कारण 70-80च्या दशकापर्यंतची स्टीरिओटाइपमध्येच विचार करणारी हिंदी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकही हा प्रवास तडीला जाऊ देत नसत. तेव्हा हा प्रवास यशस्वी करून दाखवल्याबद्द्ल विनोद खन्नाला 100 गुण. 
नायक म्हणून कारकीर्द सुरू झाली तेव्हा वर म्हटल्याप्रमाणे देखण्या, तगड्या आणि सॉफिस्टिकेटेड व्यक्तिमत्वाच्या नायकाची गरज तो पुरी करत होता. या व्यक्तिमत्त्वामुळे ‘इम्तिहान’, ‘इन्कार’, ‘अचानक’, ‘शक’ अशा चित्रपटातल्या एकल नायकाच्या भूमिकांतही तो शोभला. वैविध्य होते ते कथांमधले. नायकाच्या व्यकित्मत्वात, किंबहुना पडद्यावर वेगळी छाप पाडून दाखवू शकणाऱ्या व्यक्तिरेखा त्याच्या वाट्याला कितीशा आल्या, मुळात आल्या की नाही हा प्रश्न उरतोच. 
राजेश खन्नाचा काळ सरता सरता मल्टीस्टार चित्रपटांचा काळ बहरला. भव्य बजेट, बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरणारे अनेक स्टार एकत्र आणि मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, यश चोपड़ा, रमेश सिप्पी यांच्यासारखे यशस्वी निर्माते-दिग्दर्शक यांनी मल्टीस्टारर ही कल्पना अक्षरशः गाजवली. या घटिताचे फायदे काही अभिनेत्यांना, अभिनेत्रींना मिळाले. स्वतःच्या क्षमतेच्या जोरावर नव्हे तर इतर सहकलावंतांच्या क्षमतेच्या जोरावर यशस्वी झालेले चित्रपट आपसूक त्यांच्या फिल्मोग्राफीत जमा झाले. विनोद खन्ना यात नेमका कुठे बसतो ती चिकित्सा व्हायला हवी. 
पटकन आठवतात ते ‘अमर अकबर अँथनी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘ज़मीर’, ‘हेराफेरी’, ‘बर्निंग ट्रेन’... ‘अमर अकबर अँथनी’ आजही एखाद्या वाहिनीवर लागला की तिथेच सर्फिंग थांबवून बघावासा वाटतो, तो त्या अँथनी गोन्साल्विस आणि अकबर इलाहाबादीच्या अतरंगी लीलांसाठी, तद्दन अतार्किक गोष्टी गुंफूनही प्रेक्षकाला खिळवून ठेवणाऱ्या चोख पटकथेसाठी, आणि असा हा अतार्किक चित्रपट प्रेक्षकाच्या गळी उतरवणाऱ्या मनमोहन देसाईंच्या कॉन्व्हिक्शनसाठी. अमरचं काय?  सॉरी! शबानाच्या आग्रहाखातर मनमोहन देसाईंनी तिला ‘या चित्रपटात तुझ्या योग्यतेची भूमिकाच नाही, पण तुझा हट्टच आहे तर अमरच्या प्रेयसीची भूमिका देतो’ असं मनमोहन देसाईंनी शबानाला म्हटल्याचं वाचलं होतं. ते खरं असेल किंवा नसेल, पण वस्तुस्थिती तशीच होती. आणि दुसरी वस्तुस्थिती म्हणजे जी शबानाच्या भूमिकेविषयी तीच विनोद खन्नाच्या भूमिकेविषयी. किंबहुना अँथनी आणि अकबरच्या अतरंगी व्यक्तिरेखांमध्ये विनोद खन्नाची कल्पना करता येत नाही. ही दुर्देवाने त्याची मर्यादा. 
ऑथर-बॅक्ड रोल मिळणं हे अभिनेत्याचं सुदैव असतं. पण ‘ऑथर’च्या प्रतिभेला धुमारे फोडण्याचं सामर्थ्यदेखील अभिनेत्यात असावं लागतं. ते अमिताभमध्ये होतं. त्यानं ते पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवलं, आजही दाखवतो आहे.  ऋषी कपूरमध्येही होतं, आहे. ‘नसीब’ मध्ये अमिताभबरोबर असताना ऋषी झाकोळून गेला नाही. ‘चुपके चुपके’मध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ, ‘शोले’मध्ये धर्मेंद्र-अमिताभ-संजीवकुमार आणि नव्याने उदयाला येऊन पडदा व्यापणारा अमजद अशी ठसठशीत व्यक्तिमत्वं पडद्यावर कोरली गेली. ‘ज़मीर’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘हेराफेरी’मध्ये असं कितपत झालं? या चित्रपटांच्या उल्लेखाबरोबर पहिला आठवतो तो कोण?... काळाची पानं उलटत जाताना त्यातला विनोद खन्ना धूसर का होत गेला?
1982 मध्ये त्यानं चित्रपटातून संन्यास घेऊन अध्यात्माचा मार्ग पत्करला, तेव्हा आपल्या चित्रपटीय कारकीर्दीविषयी त्याची नेमकी भावना काय होती, हे कळायला मार्ग नाही. पण त्याचं - एका स्टारचं, हीरोचं - अचानक संन्यास घेणं आणि रजनीश आश्रमात दाखल होणं ही मोठी बातमी होती. पाचच वर्षांनी त्यानं पुन्हा रजनीश आश्रमाचा परित्याग करून चित्रपटाश्रमात प्रवेश केला, तो कोणत्या भावनेने हेही कोडंच आहे. अर्थात हा ज्याच्या त्याचा प्रश्न, पण या घटना आणि हे निर्णय व्यक्ती म्हणून आणि चित्रपटाचा नायक म्हणून त्याच्या चाहत्यांच्या मनातल्या प्रतिमेच्या ठामपणापुढे- कॉन्व्हिक्शनपुढे - प्रश्नचिह्न मांडतात. परत येऊन विनोद खन्नाने थोड्या थोडक्या नव्हे, 69 चित्रपटांतून भूमिका केल्या. पण पूर्वीची लोकप्रियता उरलेली नव्हती. ‘ रिहाई’, ‘लेकिन’ हे चित्रपट होते नायिकाप्रधान. ‘चाँदनी’ म्हणजे श्रीदेवी आणि ऋषी कपूर! दुसऱ्या कालखंडात यशस्वी आणि तितक्याच लोकप्रिय होणाऱ्या अभिनेत्यांची संख्या फार अल्प आहे. चित्रपटसृष्टीचाही वेग जीवनाच्या इतर क्षेत्रांमधल्या वेगाप्रमाणेच वाढता होता, आहे. प्रेक्षकांच्या पिढ्या बदलत राहतात, त्यांच्या आवडी-निवडी, मागण्या बदलत जातात. मनोरंजन करायला ताज्या दमाचे नव्या युगाचे नायक येऊन दाखल झालेले असतात. या सगळ्या परिस्थितीत आपलं स्थान निर्माण करणं, आपली अनिवार्यता निर्माण करणं (इथे केवळ उदाहरणादाखल, अमिताभशी तुलना होणं अपरिहार्य ठरतंय. ऋषी कपूरनंही हे आह्वान बऱ्यापैकी पेललं आहे.) हे आह्वान विनोद खन्ना पेलू शकला का? ‘दबंग’मध्ये त्याची सलमानच्या सावत्र पित्याची भूमिका होती. त्या भूमिकेसाठी विनोद खन्नाच केवळ अपरिहार्य होता का? ती भूमिका त्याला मनात ठेवून लिहिली गेली होती का? की सध्याचा कुणीही चरित्र अभिनेता चालला असता?  
राजाकारणात तो उतरला, त्याची चिकित्सा सामान्यपणे कुणालाही सहज करता यावी. चित्रपटातली कारकीर्द उतरणीला लागलेली असते, प्रकाशझोत बाजूला सरतो आहे हे जाणवू लागलेलं असतं आणि तिकडे राजकीय पक्षांनाही ‘जनाधार’ मिळवण्यासाठी सिनेमाच्या ‘प्रेक्षकाधारा’ची गरज भासते. अनेकदा निवडणुकीच्या प्रचारसभांना लोकांनी मोठ्या संख्येने यावं म्हणून चित्रपटातल्या ग्लॅमरस चेहऱ्याची गरज असते. या परिस्थितीत चित्रपट कलावंतांनी आणि आजच्या भाषेतल्या एकूणच सेलेब्रिटींनी राजकारणात उतरणे हा पायंडा भारतीय जनतेच्या आणि पर्यायाने प्रेक्षकांच्या चांगलाच परिचयाचा आहे. 
फाळणीच्या वेळी पंजाबमधलं गुरदासपूर भारतात घालायचं की पाकिस्तानात यावर बरीच भवती न भवती झाली होती, त्यामुळे ते इतिहासात माहितीचं झालेलं. पण त्याला खरं ग्लॅमर आलं ते देव आनंदचा जन्म त्या जिल्ह्यातला म्हणून आणि नंतर विनोद खन्नाचं गाव म्हणून. शिवाय उत्तरार्धात विनोद खन्नानं तिथून निवडणूक लढवली. गुरदासपूरकरांना आपला गाव फिल्मस्टारचा गाव ठरल्याचा आनंद असणं साहजिकच. जिंकून येणं हे अशावेळी ओघानं येतं. हेमा मालिनी मथुरेतून निवडून येते, आणि धर्मेंद्र बिकानेरमधून जिंकून येतो, मग स्वतःच्याच गुरदासपूरमधून विनोद खन्ना का येणार नाही? पण तो पुन्हा पुन्हा निवडून येत राहिला ही नक्कीच कौतुकाची बाब. म्हणजे त्यानं त्याच्या मतदारसंघाला निराश केलेलं नसावं, असं म्हणता येईल. त्यानं काही काळ सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याचं मंत्रीपद भूषवलं, तसंच नंतर परराष्ट्र खात्याचं राज्यमंत्रीपदही भूषवलं. तिथे त्याचा प्रभाव किती पडला याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पण भारतीय प्रेक्षक-मतदार हे चिकित्सेच्या पलीकडे असतात. ते चिकित्सा करत नाहीत आणि त्यांचीही चिकित्सा कुणी करू नये. राजकीय पक्षांच्या लेखी सोय ही महत्त्वाची असते. 
तेव्हा एकूणच इतिहासाला – भारतीय राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक आणि मुख्यतः चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाचा हिशोब करण्यापेक्षा ‘लोकप्रिय हिंदी चित्रपटांतला 70च्या दशकातील देखणा, लोकप्रिय स्टार हीरो’ एवढं विनोद खन्नाचं योगदान लक्षात राहिलं आहे, ते पुरेसं आहे. 
 

Web Title: Vinod Khanna - A Satyameva Medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.