‘नीट’बाबत दिलासा मिळेल - विनोद तावडे
By admin | Published: May 18, 2016 05:32 AM2016-05-18T05:32:38+5:302016-05-18T05:32:38+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सर्व राज्यांची एकच सामाईक पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) पुढील वर्षापासून व्यवस्थितपणे लागू करावी़
नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सर्व राज्यांची एकच सामाईक पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) पुढील वर्षापासून व्यवस्थितपणे लागू करावी़ किमान या वर्षी तरी राज्यनिहाय प्रवेश परीक्षा घेण्यास मुभा द्यावी, या महाराष्ट्र सरकारच्या मागणीवर केंद्रातील सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले असून, केंद्र सरकार याबाबत सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणार आहे़ त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेबाबत दिलासा मिळणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले़
तावडे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा योग्य निवाडा येणार असून, केंद्र सरकारला अध्यादेश काढण्याची गरज पडणार नाही. एमबीबीएस व बीडीएससाठी नीट दिलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क हे प्रवेश घेतेवेळी कमी केले जाणार आहे़ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पुढील वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट (पीजी) सुरू केले जाणार आहे़ त्याबाबत मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्यासोबत तावडे यांनी चर्चा केली आहे़ तसेच कौन्सिलच्या माध्यमातून नॅचरोपॅथी, योगा असे विविध अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
> समाजोपयोगी
संशोधन व्हावे
वैद्यकीय क्षेत्राकडून समाजाची वेगळी अपेक्षा असते. इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा डॉक्टर्स हे समाजाच्या सर्वाधिक जवळ असतात. त्यामुळे त्यांनी समाजोपयोगी संशोधनदेखील केले पाहिजे, असे प्रतिपादन विनोद तावडे यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १५व्या पदवीप्रदान सोहळ्यात केले.
विविध विद्याशाखांच्या एकूण ७,१६८ विद्यार्थ्यांनी पदवीप्राप्त केली. ७३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.