विनाचालक माल ट्रक नाल्यात

By admin | Published: September 18, 2016 12:48 AM2016-09-18T00:48:34+5:302016-09-18T00:48:34+5:30

जेजुरी महामार्गावरील जेजुरीनजीक लवथळेश्वर येथील नाल्यात आज एक मार्गावर उभा असलेला विनाचालक माल ट्रक गेला.

Vinyl Mall Truck Nalat | विनाचालक माल ट्रक नाल्यात

विनाचालक माल ट्रक नाल्यात

Next


जेजुरी : हडपसर - जेजुरी महामार्गावरील जेजुरीनजीक लवथळेश्वर येथील नाल्यात आज एक मार्गावर उभा असलेला विनाचालक मालट्रक गेला. वाहनचालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केलेला होता. उतारावर असल्याने तो अचानक सुरू होऊन संपूर्ण मार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूच्या नाल्यात जाऊन थांबला. सुदैवाने मार्गावर गर्दी नव्हती, की समोरून वाहने येत नसल्याने मोठा अनर्थ टळला. तुटलेला पूल, लगतच साचलेले मैलापाणी आणि शेजारीच पुलाच्या दुरुस्तीसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून पडलेले पाइप पाहून परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी मात्र याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
कोट्यवधी रुपये निधी खर्चूनही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याच्या तक्रारीही केल्या. सुमारे ४५ कोटी रुपयांचा निधी खर्चूनही महामार्गावर अजून मोठमोठे खड्डे आहेतच की मार्गावरील धोकादायक पूलही तसेच आहेत.
एवढा निधी उपलब्ध असूनही या मार्गावरील दुरुस्त्या अजूनही रखडलेल्याच आहेत. मिळालेल्या निधीतून जागोजागी खराब झालेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी रुंदीकरण, तर काही पुलांना लोखंडी संरक्षक कठडे उभे केले आहेत.
अशा धोकादायक पुलांमुळे मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे. (वार्ताहर)
>अपघाताची ठिकाणे जशीच्या तशीच आहेत. केवळ लहान-मोठ्या दुरुस्त्या व खड्डे बुजवण्याचा प्रकार झाला आहे. महामार्ग असल्याने रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, धोकेदायक पूल, तसेच चढउतार, तसेच ठेवलेले असून यामुळे अपघात कमी होण्याऐवजी वाढतानाच
दिसत आहेत.
लवथळेश्वरनजीकच्या जगतापवस्तीपासून जेजुरी पोलीस ठाण्यापर्यंत सुमारे एक किलोमीटर मार्ग अक्षरश: खड्ड्यांचा बनला आहे.
लवथळेश्वर मंदिर, जेजुरी आयसीयू केअर सेंटर हॉस्पिटल, जेजुरीतील मुख्य शिवाजी चौक, मोरगाव चौक आदी ठिकाणी एक-एक फूट खोलीचे खड्डे पडलेले आहेत.
लवथळेश्वर येथील माही पेट्रोल पंपालगतचा पूर्णपणे जीर्ण व तुटलेला पूल अत्यंत धोकादायक बनलेला आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्षच होत आल्याने मोठी नाराजी आहे.
>शासनाने आळंदी-पंढरपूर या पालखी मार्गाला आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केलेले आहे. त्यासाठी केंद्रीय व राज्यपातळीवरून नियोजन सुरू आहे.
यातील हडपसर ते जेजुरीदरम्यान ४१ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे.
>महामार्गावरील खड्डे ताबडतोब बुजवण्यात येतील, त्याचबरोबर या पुलाच्या दुरुस्तीबाबत वरिष्ठांशी बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्या पुलाची दुरुस्ती आवश्यकच आहे.
- अभय आवटे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
>नागरिकांचे
आरोग्य धोक्यात
संपूर्ण लवथळेश्वर परिसरातील गटारांचे पाणी याच नाल्यात सोडलेले असल्याने ते मैलापाणी याच पुलाखाली साचलेले आहे.
परिसरात दुर्गंधी पसरलेली आहेच. शिवाय नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे. जेजुरी नगरपालिकेकडूनही या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचेही परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.

Web Title: Vinyl Mall Truck Nalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.