राज ठाकरेंकडून अटींचं उल्लंघन? कारवाई होणार? गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचं सूचक विधान, म्हणाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 10:06 AM2022-05-02T10:06:29+5:302022-05-02T10:07:14+5:30
Raj Thackeray Aurangabad Sabha: राज ठाकरेंच्या कालच्या सभेत पोलिसांनी घातलेल्या अटींचं उल्लंघन झालं आहे का, तसेच राज ठाकरेंनी भाषणातून अटींचं उल्लंघन झालं आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे, त्यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.
पुणे - मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथे सभा घेऊन याबाबत आपली भूमिका अधिक स्पष्ट केली होती. त्यावेळी चार तारखेपासून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. दरम्यान, राज ठाकरेंच्या कालच्या सभेत पोलिसांनी घातलेल्या अटींचं उल्लंघन झालं आहे का, तसेच राज ठाकरेंनी भाषणातून अटींचं उल्लंघन झालं आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई होणार का असा सवाल विचारला जात आहे, त्यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, भोंग्यांसंदर्भातील निर्णय हा काही राज ठाकरेंनी घ्यायचा नाही आहे. कालच्या सभेमध्ये त्यांनी फक्त पवार साहेबांवर टीका करणं आणि समाजा समाजामध्ये भावना भडकतील कशा, द्वेश निर्माण होईल याचाच प्रयत्न केला. कालचं भाषण पोलीस ऐकतील. त्यानंतर काय आक्षेपार्ह आहे काय नाही याबाबत निर्णय घेतील आणि त्यावर अंतिम निर्णय घेतील, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगतले.
राज ठाकरेंच्या सभेत पोलिसांच्या अटींचं पालन झालं नसल्याबाबत वळसे-पाटील म्हणाले की, या संदर्भात औरंगाबादचे पोलीस कमिशनर आज त्या संदर्भातील व्हिडीओ पाहतील. त्यात अटीशर्तींचं कुठे कुठे उल्लंघन झालं याचा आढावा घेतील. कायदेशीर सल्ला घेतील. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवतील. त्यानंतर वरिष्ठ त्याबाबत निर्णय घेतील. दरम्यान, सर्व समाजाला आवाहन आहे की, त्यांनी समाजात शांतता, सलोखा ठेवण्याचं काम करावं. कुणीही तापवातापवी पेटवापेटवीचं काम करत असेल तर त्यांना साथ देऊ नये, असे आवाहनही वळसे-पाटील यांनी केलं.
दरम्यान, राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचाही वळसे पाटील यांनी समाचार घेतला, ते म्हणाले की, राज ठाकरेंनी शरद पवारांवर आरोप केल्याने त्यांच्यावर काही परिणाम होईल असं नाही. पवार साहेबांचं राजकीय आणि सामाजिक जीवन महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्यांनी नेहमी विकासाचं काम केलेलं आहे. समाजाला एकत्र ठेवण्याचं, उभं करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्यामाध्यमातून हजारो निर्णय झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला आजची समृद्धी मिळाली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सांगण्याला काहीच कार्यक्रम नाही ते असे आरोप करतात.
दुसरं काही सांगायला नसल्याने शरद पवारांच्या नास्तिकतेचा मुद्दा उपस्थित केला गेला. घटनेनुसार प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे पवार हे नास्तिक आहेत हा मुद्दा होऊ शकत नाही. त्याच्याऐवजी राज्यातील बेरोजगार मुलांच्या नोकरीबाबत, शेतकऱ्यांबाबत काही बोलायला हवं होतं. पेट्रोल-डिझेलच्या महागाईबाबत बोलायला पाहिजे. राज ठाकरेंचं कालचं सगळं भाषण हे शरद पवार आणि भोंगे या दोन विषयांच्या बाहेर गेलं नाही. त्यांच्याकडे सांगण्यासाठी कुठलाही कार्यक्रम नाही. त्यांनी साधी बालवाडी चालवलेली नाही. त्यामुळे भाषणं करणं आणि समाजात तेढ निर्माण करणं एवढंच काम त्यांच्याकडे आहे. शरद पवार हे नास्तिक आहे किंवा काय याचं ते प्रदर्शन करत नाही. ते मुख्यमंत्री असताना अनेकदा भीमाशंकरला आलेले आहेत.