प्रवासी बोट वाहतुकीत नियमांचे उल्लंघन; रवींद्र चव्हाण यांची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:56 AM2018-11-30T05:56:43+5:302018-11-30T05:56:53+5:30
स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जाणारी स्पीड बोट उलटून झालेल्या अपघाताची चौकशी सुरू आहे.
मुंबई : प्रवासी बोट वाहतुकीत निमयांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरूवारी विधान परिषदेत मान्य केले. याबाबत नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जाणाऱ्या बोटीला झालेल्या अपघाताबाबत शिवसेना सदस्य अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन सूचनेवरील चर्चेत चव्हाण बोलत होते.
स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जाणारी स्पीड बोट उलटून झालेल्या अपघाताची चौकशी सुरू आहे. याशिवाय नौकानयन सल्लागारांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने या प्रकरणाची चौकशी पूर्ण केली आहे. दहा ते पंधरा दिवसात त्याचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही चव्हाण म्हणाले.
२४ आॅक्टोबर रोजी चार बोटींमधून मुख्य सचिव, अधिकारी, पदाधिकारी आणि पत्रकार गेट वे आॅफ इंडिया येथून निघाले. यापैकी एका बोटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने आणि अननुभवी नाविक असल्याने ती खडकावर आदळली. बोटीत पाणी शिरल्याने बोट बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
चव्हाण म्हणाले, बोट मालकाचा परवाना निलंबित केला असून मालक आणि चालकाला नोटीस बजावली आहे. नियमांच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
बंदरातून एका वेळी एकच बोट सोडली जावी. प्रत्येकाला लाईफ जॅकेट अनिवार्य करावे, जास्त प्रवासी बोटीतून नेल्यास बंदर निरीक्षकांवर कारवाई करावी, किनाºयावर सीसीटीव्ही लावावे आणि बोट वाहतुकीबाबत नियंत्रण आणि पारदर्शकता असली पाहिजे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.