त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधाला राज्यात लागले हिंसक वळण; पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 09:41 PM2021-11-12T21:41:46+5:302021-11-12T21:41:59+5:30

दगडफेकीत दुकाने-वाहनांचे नुकसान; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आणली नियंत्रणात

Violence breaks out during Bandh in Nanded Malegaon amravati police controlled situation | त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधाला राज्यात लागले हिंसक वळण; पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात

त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधाला राज्यात लागले हिंसक वळण; पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात

Next

मुंबई : त्रिपुरा येथे मागील काही दिवसांपासून अल्पसंख्याक नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लीम बांधवांनी राज्यातील विविध शहरांत पुकारलेल्या बंदला व काढलेल्या मोर्चांना हिंसक वळण लागले. काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

राज्यातील मालेगाव (नाशिक), औरंगाबाद, अमरावती, नांदेड, कारंजा लाड (वाशिम) या शहरांत बंदचे आवाहन करण्यात आले होते. तसेच मोर्चांचेही आयोजन करण्यात आले होते. रजा अकादमी आणि विविध मुस्लीम संघटना यात सहभागी झाल्या होत्या.

औरंगाबाद : मुस्लीमबहूल भागात कडकडीत बंद
औरंगाबाद शहर बंदच्या दिलेल्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुस्लीमबहुल भागात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटी, जमात-ए-इस्लामी हिंद यांच्यासह सर्वच मुस्लीम संघटनांनी बंदला पाठिंबा दिला होता. शुक्रवारी सकाळपासून एकही दुकान उघडले नाही.

नांदेड : काही पोलीस जखमी, अश्रुधुराचा वापर
सकाळपासून शांततेत असलेल्या बंदला दुपारी दोन वाजेनंतर हिंसक वळण लागले. देगलूर नाका परिसरात जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. यावेळी दगडफेकीत अनेक दुकाने आणि वाहनांचे नुकसान झाले. दुकानांवर जमावाने तुफान दगडफेक केली. यात चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले. देगलूर नाका भागात जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्यासह अनेक कर्मचारी जखमी झाले.

अमरावती : दुकानांची तोडफोड, दगडफेक
अमरावती शहरात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. सुमारे ३० हजारांच्या जमावाने अनेक दुकाने व मॉलला लक्ष्य केले. दगडफेक करण्यात आली. हे सर्व अनपेक्षितपणे घडल्याने पोलिसांचीदेखील तारांबळ उडाली. पोलिसांनी सात तक्रारी नोंदवून घेत शेकडो आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यावेळी पोलिसांशी त्यांची झटापट झाली.

कारंजा लाड : हिंसक वळण, दुकानांवर दगडफेक
बंदला कारंजात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदची हाक देणाऱ्यांनी तीन दुकानांवर दगडफेक करून तोडफोड केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत झाले. दगडफेकीत दुकानांच्या काचा फुटल्या तसेच साहित्याचेही नुकसान झाले. मुस्लीम बांधवांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती.

मालेगाव : पोलिसांकडून लाठीमार, १० कर्मचारी जखमी
मालेगाव येथे बंदला हिंसक वळण लागले. सायंकाळी जमावाने दगडफेक सुरू केल्याने तणावपूर्ण परिस्थिती झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यासह लाठीचार्ज करावा लागला. दगडफेकीत पोलिसांच्या दंगानियंत्रण पथकाच्या वाहनाचे नुकसान झाले तर ३ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ जवानदेखील जखमी झाले. पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

संयम राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन
राज्यात आयोजित मोर्चांना काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागामधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

Web Title: Violence breaks out during Bandh in Nanded Malegaon amravati police controlled situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.