CAA : देशातील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं मोठं अपयश; सुप्रिया सुळेंनी केली अमित शहांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 05:46 PM2019-12-17T17:46:31+5:302019-12-17T17:47:05+5:30
Citizen Amendment Act : दिल्लीत विद्यापीठाच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला
बारामती - सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशात जो हिंसाचार सुरु आहे हे केंद्रीय गृहमंत्रालयाच अपयश आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहांना लगावला आहे. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. देशात पहिल्यांदाच एवढा अत्याचार पाहिला असून देशाला आणि राज्याला शांततेची गरज असल्याचं त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दिल्लीत विद्यार्थ्यांना जी मारहाण करण्यात आली या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हायला हवी. देशात अनेक प्रश्न आणि समस्या असताना यावरुन लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील विधिमंडळात सुरु असणाऱ्या विरोधकांच्या गोंधळाचाही सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला. मागील ५ वर्षात केलेला गोंधळ बाहेर येऊ नये या भीतीनेच विरोधत सभागृहात गोंधळ घालत आहेत असा आरोप त्यांनी केला.
दिल्लीत विद्यापीठाच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला. ग्रंथालय हे शांततेचं ठिकाण असतं. मात्र पोलिसांनी त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. दिल्लीत झालेला हिंसाचार देशाच्या गृह मंत्रालयाचं अपयश आहे असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.
त्याचसोबत मुंबईत लोकल रेल्वेवर असणारा भार लक्षात घेता प्राधान्याने प्रवाशांच्या सुरक्षितेकडे लक्ष देणं गरजेचे आहे. बुलेट ट्रेनपेक्षा लोकांचा जीव महत्वाचा आहे. बुलेट ट्रेनचा निधी मुंबई उपनगरासाठी द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.
दरम्यान, नागपूर अधिवेशनातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना केंद्रातील सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. देशात आणि राज्यात अस्थिरतेचे, अशांततेचं वातावरण निर्माण केलं जातं. दिल्लीच्या विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांवर गोळीबार केला जालियनवाला बाग हत्याकांडासारखं वातावरण देशात निर्माण केलं जातंय का याची शंका उपस्थित होते. संपूर्ण जगात भारत सर्वाधिक जास्त तरुण असलेला देश असणार आहे. त्यामुळे ही युवाशक्ती आहे, बॉम्ब आहे याची वात पेटवण्याचा प्रयत्न करु नये अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर घणाघात केला.