दिल्लीत हिंसाचार; राज्यात सतर्कतेच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 06:31 AM2019-12-17T06:31:57+5:302019-12-17T06:32:04+5:30
कॅबविरोधातील असंतोष; डाव्या, विद्यार्थी संघटनांवर पोलिसांचे लक्ष
मुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात (कॅब) देशातील राजधानी दिल्ली व पूर्व भागातील वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: या कायद्याला विरोध करणाऱ्या डाव्या, विद्यार्थी संघटना, संस्थांवर लक्ष ठेवण्याची सूचना पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी सर्व पोलीस घटकप्रमुखांना दिली आहे.
हिवाळी अधिवेशन, ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ‘कॅब’विरोधातील आंदोलनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याबाबत विशेष खबरदारी बाळगण्याची सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कॅब विधेयकाला हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळविली. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी त्यावर स्वाक्षरी केल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्याविरोधात पूर्व राज्ये व दिल्लीत हिंसक आंदोलने होत आहेत. राज्यातही कॉँग्रेस, राष्टÑवादी व डावे पक्ष आणि संघटनांनी विरोध दर्शविला आहे. राज्यात विविध ठिकाणी त्याच्या निषेधार्थ आंदोलनेही करण्यात येत आहेत. मात्र दिल्लीतील जामिया विद्यापीठ व अन्यत्र झालेल्या हिंसक आंदोलनाचे पडसाद राज्यातही उमटण्याची शक्यता आहे. विशेषत: काही विद्यार्थी संघटनांकडून आंदोलनाची तीव्रता वाढविण्याची शक्यता असल्याने त्याबाबत खबरदारी बाळगण्याची सूचना पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी केली आहे. महाविद्यालयीन परीक्षा सुरू असल्याने आंदोलनामुळे त्याचे वेळापत्रक बिघडू नये, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निमाण होऊ नये, यासाठी महाविद्यालयीन परिसर व महत्त्वाच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.