नाशिकजवळील हरसूलमध्ये हिंसाचार, परिस्थिती नियंत्रणात
By admin | Published: July 14, 2015 05:26 PM2015-07-14T17:26:01+5:302015-07-14T17:26:01+5:30
नाशिकजवळील हरसूल येथे दोन गटात निर्माण झालेल्या हाणामारीमुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १४ - नाशिकजवळील हरसूल येथे दोन गटात निर्माण झालेल्या हाणामारीमुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून दोन पोलिस अधिकारीही या दंगलीत जखमी झाले आहेत.
हरसूल येथे मंगळवारी सकाळी दोन धार्मिक गटांमध्ये हाणामारी झाली व अवघ्या काही वेळेत याचे लोण संपूर्ण शहरात पसरले. या दंगलीत संमाजकंटकांनी शहरातील दुकानांचीही तोडफोडही केली. यानंतर हरसूल येथे पोलिसांचा फौजफाटा तैनात असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. या दंगलीत जखमी झालेल्या पोलिसांवर नाशिकमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या दंगलीनंतर हरसूलसह नाशिकमधील संवेदनशील परिसरातही कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान वाशिम जिल्ह्यातील करंजा येथेही दोन गटात हिंसाचार झाल्याने तणाव निर्माण झाला होता. एका समाजाच्या तरुणाने दुस-या समाजातील लहान मुलीची छेड काढल्याने दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाली. करंजा येथेही राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत एका तरुणाचा मृत्यू झाला. कारंजा येथील परिस्थितीही नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.