भारत बंदला राज्यात हिंसक वळण; धुळ्यात गोळीबार, विदर्भात लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 05:40 AM2020-01-30T05:40:04+5:302020-01-30T05:40:18+5:30
विदर्भात यवतमाळ, व-हाडात अकोला, वाशीम, खान्देशात जळगाव, धुळे, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्रात सांगली-मिरज येथे अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.
मुंबई : नागरिकत्व कायद्यांविरोधात बहुजन क्रांती मोर्चा आणि अन्य संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. धुळ्यात जमावाने दगडफेक केल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करुन अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत दोन पोलीस अधिकारी आणि १२ पोलीस शिपाई जखमी झाले. विदर्भात यवतमाळ, व-हाडात अकोला, वाशीम, खान्देशात जळगाव, धुळे, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्रात सांगली-मिरज येथे अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.
गडचिरोलीत ग्रामीण भागात परिणाम नाही
गडचिरोली : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात विविध पक्षांच्या वतीने आयोजित भारत बंदला गडचिरोली शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र ग्रामीण भागात मात्र या बंदचा परिणाम जाणवला नाही. गडचिरोली बहुजन क्रांती मोर्चा या सर्वपक्षीय संघटनेच्या पुढाकाराने गडचिरोलीत बंदचे आवाहन करण्यात आले होते. शहरातील इंदिरा गांधी चौकात सकाळपासून विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बंदच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करून सरकारच्या धोरणावर आसूड ओढले.
व-हाडात गालबोट
अकोला : ‘भारत बंद’ला पश्चिम वºहाडात गालबोट लागले. अकोल्यातील पातुरात आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत रेस्टॉरंट, बस व खासगी वाहनांचे नुकसान झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला व दहा आंदोलकांना ताब्यात घेतले. वाशिमधील कारंजा व रिसोड शहरात दुकानांवर दगडफेक तसेच काही वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने या दोन्ही शहरांत तणावपूर्ण शांतता आहे. बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा आणि शेगाव येथे किरकोळ कारणावरून वाद झाला. यात शेगाव येथील एका दुकानावर दगडफेक झाली तर सोनाळा बसस्थानक परिसरात झालेल्या वादात एक जण जखमी झाला आहे.
पातूर येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. पातूर येथील पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजंूना वाहतुकीची कोंडी झाली होती. या दरम्यान, काही आंदोलकांनी अचानक दगडफेक केली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या, तर बिकानेर रेस्टॉरंटचेही नुकसान झाले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आक्रमक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. अकोला येथूनही पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलाविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा व रिसोड शहरात दगडफेक झाली. कारंजात तणावपूर्ण शांतता आहे.
मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद
औरंगाबाद : मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड आणि हिंगोलीत बंदला गालबोट लागले. औरंगाबादमध्ये बळजबरी बस थांबविणाºया आंदोलकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करीत त्यांच्या हातातील व्हिडिओ कॅमेºयाची तोडफोड केल्याची घटना दिल्लीगेट येथे घडली. हर्सूल टी पॉर्इंट, सिटीचौक आणि बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या.
नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात एका दुकानावर दगडफेक केल्यामुळे परिसरात तणाव होता़ जालना, बीड शहरातील प्रमुख बाजारपेठेतील अनेक दुकाने दुपारपर्यंत बंदच होती. उस्मानाबाद, कळंब शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला तर लोहारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला़ भूम व वाशी तालुक्यातील पारगाव बाजारपठ सुरळीत सुरू होती़ लातूर शहरासह जिल्हाभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणी शहर आणि पाथरीत बाजारपेठ कडकडीत बंद होती.
खान्देशात हिंसक वळण
जळगाव : खान्देशात धुळ्यासह जळगाव, भुसावळ येथे बंदला हिंसक वळण लागले. धुळे शहरातील चाळीसगाव चौफुलीवर रास्तारोको आंदोलन होत असल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत आंदोलन मिटविले आणि जमावाला पांगविले़
त्याच दरम्यान पश्चिम हुडको भागातील पवननगर परिसरात पोलीस स्टेशनच्या समोरील चौकात रिक्षा आणि दुचाकीचा किरकोळ अपघात झाला़ अपघाताच्या ठिकाणी जमाव जमला़ हा जमाव हटवित असताना कोणीतरी पोलिसांच्या दिशेने दगड भिरकाविला़ वातावरण तणावपूर्ण होताच पोलिसांची कुमक बोलाविण्यात आली़ क्षणार्धात दगड, विटा आणि काचेच्या तुकड्यांचा खच चौकात झाला होता़ अशातच पोलिसांच्या दोन दुचाकी, नादुरुस्त कार देखील जमावाकडून जाळण्यात आली़ परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आणि पोलीस कर्मचारी यांनी प्रत्येकी दोन राऊंड हवेत गोळीबार केला़ तर ६ अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दगडफेकीत दोन पोलीस अधिकारी आणि १२ पोलीस शिपाई जखमी झाले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.