CAA Protest: मराठवाड्यामध्येही हिंसक वळण; जाळपोळीच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 06:06 AM2019-12-21T06:06:59+5:302019-12-21T06:34:20+5:30

अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि बीडमध्ये पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

Violent turn in Marathwada too; Incidence of traps | CAA Protest: मराठवाड्यामध्येही हिंसक वळण; जाळपोळीच्या घटना

CAA Protest: मराठवाड्यामध्येही हिंसक वळण; जाळपोळीच्या घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनाची धार राज्यातही तीव्र झाली असून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांनी महाराष्ट्र दणाणून गेला. मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले.

अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि बीडमध्ये पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. औरंगाबाद आणि नांदेडमध्ये मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शांततेत आंदोलन झाले. आंदोलनासाठी नागरिक उस्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. त्यातही तरुणांची संख्या लक्षवेधी होती.


औरंगाबादेत विविध मुस्लीम आणि दलित संघटनांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत एल्गार पुकारला. या मोर्चात अक्षरश: जनसागर उसळला होता. शहरात कडकडीत बंद होता. बीडमध्ये मोर्चेकऱ्यांनी बसवर दगडफेक केल्याने पोलिसानी अश्रूधुराच्या ४ नळकांड्या फोडल्या. यात ८ ते १० पोलीस आणि होमगार्ड जखमी झाले.


कळमनुरी येथे ४ एसटी बसेस फोडल्या. यामध्ये दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. दुपारी नवीन बसस्थानकासमोर मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी लाठीमार केला. अश्रूधुराचे नळकांडेही फोडले. त्यानंतर जमाव पांगला गेला. दिवसभर शहरात कडकडीत बंद होता. परभणीसह जिल्ह्यात पाथरी, पूर्णा, पालम येथे मोर्चा काढण्यात आला. परभणी शहरात मोर्चेकरी परतत असताना काही जणांनी मनपाच्या अग्नीशन दलाच्या गाडीवर (पान १२ वर) दगडफेक केली. दुचाकी वाहनांचेही नुकसान केले.


नांदेडात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले़ हजारोंच्या संख्येने नागरिकांनी तब्बल सव्वातीन तास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठाण मांडले होते़ लातूर जिल्ह्यातील निलंगा, औराद शहाजानी आणि किनगाव येथ मोर्चा काढण्यात आला़ निलंगा येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.


पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, मिरज, सोलापूर, फलटण येथे आंदोलन झाले. मिरजेत संविधान बचाव कृती समितीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम कार्यकर्ते उस्फुर्तपणे हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. कोल्हापूरात बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पुण्यात निघालेल्या मोर्चात आंदोलकांनी ‘भारत में हम किराएदार नहीं बराबर के हिस्सेदार हैं !, ‘सेव्ह कॉन्स्टिट्यूशन रिजेक्ट कॅब’ असे लिहिलेले फलक हातात धरले होते.


अहमदनगर शहर, संगमनेर, राहाता, कोपरगाव, जामखेड शहरात संविधान बचाओ मोर्चा काढण्यात आला. खान्देशात जळगाव, भुसावळ, अमळनेर, जामनेर, धुळे व शहाद्यात मोर्चे काढण्यात आले. रायगड जिल्ह्यात पनवेल आणि मानगाव येथे तर ठाणे जिल्ह्यात भिवंडीतही आंदोलन झाले.

नाागपुरातही प्रचंड मोर्चा
मुस्लीम समाजाचा लक्षवेधी रोष नागपुरकरांनी अनुभवला. हिवाळी अधिवेशनानिमित्त सरकार नागपुरात असताना आंदोलनासाठी प्रचंड मोठ्या संख्येने मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला. मुस्लीम समाजाची ही वज्रमुठ सरकारसाठी एक ईशारा असल्याची भावना मोर्चेकºयांनी व्यक्त केली.

Web Title: Violent turn in Marathwada too; Incidence of traps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.