‘कोपर्डी’च्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये विराट मोर्चा
By admin | Published: August 10, 2016 04:46 AM2016-08-10T04:46:36+5:302016-08-10T04:46:36+5:30
कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या निषेधार्थ मराठा समाजाने मंगळवारी येथे विराट मोर्चा काढत आरोपींना फाशी देण्याची मागणी केली
औरंगाबाद : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या निषेधार्थ मराठा समाजाने मंगळवारी येथे विराट मोर्चा काढत आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे यात कुठल्याही राजकीय पक्षाचा सहभाग नसताना अन्यायी घटनेच्या विरोधात मराठा समाज एकवटल्याचे पाहायला मिळाले. ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या नावाने झालेल्या आंदोलनात तब्बल पावणेदोन लाख मराठा बांधव सहभागी झाले होते.
‘आमच्या पोरीची अब्रू इतकी स्वस्त कशी...? कोपर्डीच्या नराधमांना तात्काळ फाशी..’ अशा भावना व्यक्त करणारे फलक लोकांनी हातात घेतले होते. क्रांतीचौकातून सकाळी ११ वाजता मूक मोर्चाला सुरुवात झाली. तेथून पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, सराफा रोड, शहागंजमार्गे मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. समाजातील विविध क्षेत्रातील, वयोगटातील महिला, पुरुष तसेच तरुण यात सहभागी झाले. महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिलांची संख्या वाखाणण्याजोगी होती. विभागीय आयुक्तालयावर मोर्चा पोहोचला तेव्हा त्याचे शेवटचे टोक क्रांतीचौकात होते.
सर्व मोर्चेकऱ्यांनी काळा पोषाख परिधान केला होता. कोणी डोक्याला तर कोणी दंडाला काळी फीत बांधली होती. शेकडो युवक-युवतींच्या हातात फलक होते.
त्यावर ‘फास्ट-ट्रॅक कोर्टाचा उपयोग करा...नराधमांना फाशी द्या’, ‘अन्यायाविरुद्ध करू या बंड...कोपर्डीच्या गुन्हेगारांना मृत्युदंड’, ‘कोपर्डीच्या आरोपींची शिक्षा काय...तोडून टाका हात पाय’ अशा घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. कोणी भगवे झेंडे तर कोणी काळे झेंडे हातात घेतले होते.
विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनाचे जाहीर वाचन करण्यात आले. क्रांतीदिनी निघालेल्या मोर्चातून मराठा समाजाने ‘महिलांवरील अत्याचाराला’ चले जाव म्हटले. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला ‘मी एकटी नाही’. माझ्या पाठीशी समाज भक्कमपणे उभा आहे, असा संदेश दिलेला असल्याचे अश्विनी भालेकर यांनी निवेदनातून सांगितले. कोमल औताडे या तरुणीने मागण्यांचे वाचन केले. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सर्वांनी कोपर्डी हत्याकांडातील निष्पाप मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सामूहिक राष्ट्रगीत म्हणून मोर्चाची सांगता झाली. (प्रतिनिधी)