विरार-अलिबाग कॉरिडॉर ५५ हजार कोटींत होणार, नऊ महानगरांना फायदा
By नारायण जाधव | Published: January 20, 2024 06:15 AM2024-01-20T06:15:52+5:302024-01-20T06:16:25+5:30
मार्चमध्ये टेंडर काढणार; मे महिन्यात हाेणाऱ्या भूसंपादनासाठी येणार २२ हजार कोटी रुपये खर्च
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) बांधण्यात येत असलेल्या विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर प्रकल्पासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्प खर्चात सर्वात मोठा वाटा भूसंपादनाचा असून त्यासाठी २२ हजार कोटींचा खर्च महामंडळाला येईल.
या प्रकल्पासाठी मार्चमध्ये निविदा काढल्या जाणार असून ९० टक्के भूसंपादन झाल्यावर मे महिन्यात कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) जारी केले जाणार आहेत. नऊ महानगरांसह जेएनपीटी आणि नवी मुंबई विमानतळाला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.
विरार-अलिबाग काॅरिडॉर अस्तित्वात आल्यानंतर वसई-विरारसह मीरा-भाईंदर, मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकांच्या क्षेत्रातील अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कायमची दूर होणार आहे.
असा आहे प्रकल्प...
एकूण खर्च
५५,००० कोटी रुपये
भूसंपादनासाठी
येणारा खर्च
२२,००० कोटी रुपये
प्रत्यक्ष
बांधकामाचा खर्च
१९,००० कोटी रुपये
आस्थापनांवरील खर्च
१४,००० कोटी रुपये