विरारमध्ये आरपीआय तालुकाध्यक्षाने केली पोलीस अधिका-याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 03:47 PM2017-09-15T15:47:09+5:302017-09-15T17:21:13+5:30
एकवीस दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये
विरार, दि. 15 - सात दिवसाच्या गणपती विसर्जनाच्यावेळी डीजे बंद करण्याच्या कारणावरुन विरार मध्ये एका महिला पोलिस अधिका-याला अश्लिल हातवारे करुन विनयभंग केल्याची घटना ताजीच असतानाच, गुरुवारी रात्री एकवीस दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये घडला आहे. आरपीआय गटाच्या वसई तालुका अध्यक्षाने दारुच्या नशेत अश्लिल भाषेत वर्तन करुन ही मारहाण केली असल्याचं मोबाइल क्लिप मधून समोर आलं आहे.
विरार पूर्व मनवेलपाडा तलावावर बंदोबस्तासाठी असलेल्या तुकाराम दराडे या पोलिसाला ही मारहाण करण्यात आली आहे. तसंच हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. मनवेल पाडा तलावावर गुरूवारी (14 सप्टेंबर) एकवीस दिवसाच्या दोन गणपतींचं विसर्जन होतं. एका गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर संत नगर येथील दुसरा गणपती बारा वाजता तलावावर पोहचला होता.
न्यायालयाच्या निर्देशानुसार दहाच्या नंतर वाद्य वाजविण्यास बंदी असल्याने बंदोबस्तावरील पोलिसांनी वाद्य बंद करायला सांगितले होते. याच कारणावरुन गणेशभक्त आणि पोलिसांत वादावादी झाली होती. याच वादावादीतून मी आरपीआय वसई तालुका अध्यक्ष आहे. असे जोरजोराने ओरड़ून सांगत चक्क दराडे नावाच्या पोलिसांच्या कानशिलात लगावली. व्यंकटेश एस. रायल्ला असं मारहाण करणा-या व्यक्तीचं नाव आहे. तो आरपीआय गटाचा वसई तालुका अध्यक्ष आहे. विरारचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक युनूस शेख यांनाही आरेरावीची भाषा वापरत असताना मोबाइल क्लिपमध्ये दिसून येत आहे.