विरारची जीवनदायी जीवदानी माता
By admin | Published: October 5, 2016 11:44 PM2016-10-05T23:44:53+5:302016-10-05T23:44:53+5:30
भारतभर एकूण एकोणपन्नास शक्तीपीठे असून भारताबाहेर नेपाळ आणि बलुचिस्तान येथे प्रत्येकी एक-एक अशी एकूण एकावन्न शक्तीपीठे आहेत. एकट्या महाराष्ट्रात अठरा
ऑनलाइन लोकमत
विरार, दि. 05 - भारतभर एकूण एकोणपन्नास शक्तीपीठे असून भारताबाहेर नेपाळ आणि बलुचिस्तान येथे प्रत्येकी एक-एक अशी एकूण एकावन्न शक्तीपीठे आहेत. एकट्या महाराष्ट्रात अठरा शक्तीपीठे आहेत. त्यात विरारची जीवदानी एक महत्वाचे शक्तीपीठ आहे. विरार रेल्वे स्टेशनपासून पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर मातेचे वास्तव्य आहे. मातेच्या वास्तव्याच्या अनेक आख्यायिका आहेत.
फार पूर्वी जीवदानी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका शेतक-याच्या शेतात एक गाय नित्यनेमाने चरण्यासाठी चरण्यासाठी येत असे. पण ती गाय कोणाची हे काही त्याला समजले नाही. दिवसभर ती शेतात चरायची आणि संध्याकाळी निघून जायची. एक दिवस तो शेतकरी त्या गायीच्या पाठोपाठ जाऊ लागला. ती गाय पूर्वेकडील डोंगरावर चढू लागली. तसा तोही तिच्यासोबत वर डोंगर चढू लागला. डोंगरावर एका मैदानात गाय थांबली. त्याच क्षणी एक तेजस्वी स्त्री तिथे प्रकटली. शेतक-याला वाटले हीच त्या गायीची मालकीण असावी. त्याने लागलीच त्या स्त्री जवळ इतक्या दिवसाच्या चा-याचे पैसे मागितले. पैसे काढून त्या शेतक-याच्या हातावर ठेवणार तोच तो शेतकरी म्हणाला, बाई मी अस्पृश्य आहे. मला स्पर्श करू नकोस. शेतक-याच्या तोंडून हे शब्द निघतात न निघतात तोच ती स्त्री नाहीशी झाली. त्याचक्षणी तेथे असलेल्या गायीने हद्यविदारक हंबरडा फोडला आणि तिने कड्यावरून खोल दरीत स्वतःला झोकून दिले.
गाईच्या बलिदानाचे रहस्य अजूनही कोणालाही उलगडलेले नाही. पण, तिने आपल्या जीवाचे दान केले म्हणूनच या डोंगराला जीवदानीचा डोंगर व डोंगरावर वसणारी आदिमाता जीवदानी म्हणून सर्वमुखी झाली. पांडव ज्यावेळी वनवासात होते, त्यावेळी काही काळ या गडावर असलेल्या गुहेत त्यांचे वास्तव्य होते, अशीही आख्यायिका सांगितली जाते.
जीवदानीचा डोंगर म्हणून प्रसिध्द असलेल्या या गडावर १७ व्या शतकाच्या सुमारास जीवधन नावाचा किल्ला अस्तिवात होता. महाराष्ट्रात गडकोट किल्ला व भुईकोट किल्ले आहेत. त्यापैकीच हा एक गडकोट किल्ला होता. आज तटाचे काही कोरीव दगड पहावयास मिळतात. मराठा सैनिकांच्या ताब्यात असलेल्या या किल्ल्यावर २७ मार्च १७३१ रोजी फिरंगी सरदाराने चढाई केली होती. त्यावेळी गडावर अवघे १०० मराठे होते. फिरंग्यांच्या सैन्यापुढे टिकाव लागणार नाही म्हणून ते अन्य दुर्गम मार्गाने किल्ला सोडून निघून गेले. फिरंगी अंमलात हिंदूंना बाटवून ख्रिस्ती करण्याचे काम केले जात असे. त्याला प्रतिबंध बसावा म्हणून हिंदूंनी धर्मसंरक्षणासाठी पेशव्यांची मदत मागितली होती. चिमाजी अप्पांनी बरवाजी ताकपीर या सरदाराला जीवधन किल्ला काबिज करण्यासाठी पाठवले होते. त्याने ३०० सैन्यांशी लढाई करून ३१ मार्च १७३९ रोजी किल्ला सर केला. टेहेळणीसाठी मोक्याची जागा म्हणून या किल्लाला त्याकाळी विशेष महत्व होते. त्यानंतर अनेक वर्षे हा किल्ला उपेक्षित राहिला. कालौघात किल्ल्याचे अस्तित्वच नष्ट झाले. किल्ला नष्ट झाला असला तरी जीवधन गडावर प्राचीन खुणा आजही लक्ष वेधून घेतात. डोंगर खोदून शिल्प निर्मितीची कला ज्याकाळी विकसित झाली होती त्या सुमारास या गडावर अज्ञात शिल्पकारांनी काही गुंफा निर्माण केल्या होत्या. त्या पांडवकालीन असाव्यात असेही सांगितले जाते.
जीवदानी मातेचे गडावर केव्हापासून वास्तव्य होते, याची माहिती उपलब्ध नाही. आख्यायिकेत सांगितल्यानुसार जेथून गाईने उडी घेतली त्या शैलशिखराच्या छोट्याशा सपाट जागेत एक तांदळा ( अष्टविनायकाच्या स्वरुपातील मूर्तीचे रुप) ठेवलेला होता. भाविक त्याचीच पूजा करीत असत. गावातील भाविक गडावर जाण्यापूर्वी गुराखीच शिळेचे पूजन करीत असत. साधारणपणे १९४६ पर्यंत हीच स्थिती होती. १९४६ ते १९५६ या काळात बारकीबाय नावाची भक्त रोज गडावर जाऊन नित्यनेमाने पूजा करीत असे. १९५६ मध्ये देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. २३ फेब्रुवारी १९५६ साली श्री जीवदानी देवी ट्रस्ट अस्तित्वात येऊन बारकीबाय एकमेव विश्वस्त झाल्या. त्यानंतर १५ ते २० वर्षात आणखी काही विश्वस्तांची त्यात भर पडली. कालांतराने याठिकाणी भव्य मंदिर बांधण्यात आले. गडावर ये-जा करण्यासाठी तेराशे पाय-या आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवस गडावर अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. नऊ दिवसात गडावर दहा लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतात.