विरारची जीवनदायी जीवदानी माता
By Admin | Published: October 8, 2016 02:26 AM2016-10-08T02:26:34+5:302016-10-08T02:26:34+5:30
भारतभर एकूण ४९ शक्तिपीठे असून भारताबाहेर नेपाळ आणि बलुचिस्तान येथे प्रत्येकी एकेक अशी एकूण ५१ शक्तिपीठे आहेत.
- शशी करपे
भारतभर एकूण ४९ शक्तिपीठे असून भारताबाहेर नेपाळ आणि बलुचिस्तान येथे प्रत्येकी एकेक अशी एकूण ५१ शक्तिपीठे आहेत. एकट्या महाराष्ट्रात १८ शक्तिपीठे आहेत. त्यात विरारची जीवदानी एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. विरार रेल्वे स्टेशनपासून पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर मातेचे वास्तव्य आहे. मातेच्या वास्तव्याच्या अनेक आख्यायिका आहेत.
फार पूर्वी जीवदानी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात एक गाय नित्यनेमाने चरण्यासाठी येत असे. पण, ती गाय कोणाची, हे काही त्याला समजले नाही. एक दिवस तो शेतकरी त्या गायीपाठोपाठ जाऊ लागला. डोंगरावर एका मैदानात गाय थांबली. त्याच क्षणी एक तेजस्वी स्त्री तिथे प्रकटली. शेतकऱ्याला वाटले हीच त्या गायीची मालकीण असावी. त्याने लागलीच त्या स्त्रीजवळ इतक्या दिवसाच्या चाऱ्याचे पैसे मागितले. पैसे काढून त्या शेतकऱ्याच्या हातावर ठेवणार तोच तो शेतकरी म्हणाला, बाई मी अस्पृश्य आहे. मला स्पर्श करू नकोस. शेतकऱ्याच्या तोंडून हे शब्द निघतात न् निघतात तोच ती स्त्री अदृश्य झाली. त्याच क्षणी तेथे असलेल्या गायीने हद्य विदारक हंबरडा फोडला आणि तिने कड्यावरून खोल दरीत स्वत:ला झोकून दिले. गायीच्या बलिदानाचे रहस्य अजूनही कोणालाही उलगडलेले नाही. पण, तिने आपल्या जीवाचे दान केले म्हणूनच या डोंगराला जीवदानीचा डोंगर व डोंगरावर वसणारी आदिमाता जीवदानी म्हणून सर्वमुखी झाली.
जीवदानीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गडावर सतराव्या शतकाच्या सुमारास जीवधन नावाचा किल्ला अस्तित्वात होता. महाराष्ट्रात गडकोट किल्ला व भुईकोट किल्ले आहेत. त्यापैकीच हा एक गडकोट किल्ला होता. आज तटाचे काही कोरीव दगड पाहावयास मिळतात. या किल्ल्यावर २७ मार्च १७३१ रोजी फिरंगी सरदाराने चढाई केली होती. त्या वेळी गडावर अवघे १०० मावळे होते. फिरंग्यांच्या सैन्यापुढे टिकाव लागणार नाही, म्हणून ते अन्य दुर्गम मार्गाने किल्ला सोडून निघून गेले. त्यानंतर, चिमाजी अप्पांनी बरवाजी ताकपीर या सरदाराला पाठवून ३१ मार्च १७३९ रोजी किल्ला सर केला. टेहळणीसाठी मोक्याची जागा म्हणून या किल्ल्याला त्या काळी विशेष महत्त्व होते.
>१९४६ पर्यंत गुराख्यांकडून शिळापूजन
जीवदानीमातेच्या गडावर केव्हापासून वास्तव्य आहे, याची माहिती उपलब्ध नाही. आख्यायिकेत सांगितल्यानुसार जेथून गायीने उडी घेतली, त्या शैलशिखराच्या छोट्याशा सपाट जागेत एक तांदळा (अष्टविनायकाच्या स्वरूपातील मूर्तीचे रूप) ठेवलेला होता. भाविक त्याचीच पूजा करीत असत. गावातील भाविक गडावर जाण्यापूर्वी गुराखीच शिळेचे पूजन करीत असत. साधारणपणे १९४६ पर्यंत हीच स्थिती होती. १९४६ ते १९५६ या काळात बारकीबाय नावाची भक्त रोज गडावर जाऊन नित्यनेमाने पूजा करीत असे. १९५६ मध्ये देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.