मराठा एकीचे विराट दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 06:06 AM2016-09-20T06:06:45+5:302016-09-20T06:06:45+5:30

सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या क्रांती मोर्चाचे विराट दर्शन आज लातूर, जालना आणि अकोला या ठिकाणी पाहायला मिळाले

Virat Darshan of Maratha Eki | मराठा एकीचे विराट दर्शन

मराठा एकीचे विराट दर्शन

Next


लातूर/ जालना/ अकोला : कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या क्रांती मोर्चाचे विराट दर्शन आज लातूर, जालना आणि अकोला या ठिकाणी पाहायला मिळाले. लाखोंच्या संख्येने जमलेल्या या मराठा जनसागरातील नि:शब्द हुंकाराने तिन्ही शहरांना अक्षरश: स्तब्ध केले. नेहमीप्रमाणे या मोर्चातही काटेकोर नियोजन आणि महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदल आणि स्वामीनाथन आयोग लागू करणे या नेहमीच्या मागण्यांशिवाय चित्रपट व नाटकांतून समाजाची बदनामी थांबवा, मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या ईबीसी सवलतीसाठी उत्पन्नमर्यादा एक लाखावरून सहा लाख करा आणि लातूर-बीदर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील मराठी भागाला महाराष्ट्रात घ्या या नवीन मागण्या लातूरच्या मोर्चातून पुढे आल्या.
लातूरमध्ये निघालेल्या महामोर्चाचा प्रारंभ सकाळी ११:४०ला जिल्हा क्रीडा संकुलात जिजाऊ वंदनेने झाला. अनेक मोर्चेकऱ्यांनी परिधान केलेला काळा पोशाख लक्ष वेधून घेत होता. पाच ते सहा किलोमीटरची पायपीट संपवून महामोर्चा बार्शी रोडवरील नव्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला तेव्हा त्याचे शेवटचे टोक मोर्चा सुरू झालेल्या शिवाजी चौकातच स्थिरावले होते. लातूर  जिल्ह्याच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मोर्चा म्हणूनच याची नोंद झाली. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना पाच मुलींनी मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर या मोर्चाची राष्ट्रगीताने सांगता झाली.
जालन्यात ७ कि.मी. रांग!
सकाळी ११.४५ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास एका मुलीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन मोर्चास प्रारंभ झाला. शिवाजी पुतळा, पाणीवेस, गरीबशहा बाजार, मंमादेवी, मस्तगड, गांधीचमन, कचेरी रोड, शनीमंदीर, उड्डाणपूल मार्गे मोर्चा अंबड चौफुलीवर पोहोचला. तेव्हा मोर्चातील शेवटची महिला ही शिवाजी पुतळा परिसरात होती. ७ किलोमीटर अंतरापर्यंत मुली आणि महिलांची रांग होती. त्यानंतर डॉक्टर्स, वकील, शिक्षक, अभियंता, युवक, मुले, व्यापारी, ज्येष्ठ समाजबांधव व मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठीतांचा सहभाग होता. अंबड चौफुलीवर मोर्चा पोहोचल्यानंतर नऊ मुलींनी जिजाऊ वंदना गायली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अकोल्यात तीन लाख महिला!
रस्त्यांवर लाखोंची गर्दी, महिलांचा लक्षणीय सहभाग, कोपर्डी येथील घटनेचा राग, मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्याचा पक्का निर्धार करून एकत्र जमलेल्या मराठा समाजाच्या जनसागराची लाट सोमवारी अकोल्याच्या रस्त्यावर उसळली. कुठेही आवाज नाही, काळजाला हात घालणारी नि:शब्द शांतता असे वातावरण मराठा समाज क्रांती मोर्चाच्या निमित्ताने अकोलेकरांनी पहिल्यांदाच अनुभवले.
सकल मराठा समाजाचा विदर्भातील पहिला मोर्चा सोमवारी अकोल्यात निघाला. या मोर्चाने आतापर्यंतच्या गर्दीचे उच्चांक मोडीत काढले. स्थानिक अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर सकाळी सात वाजेपासूनच मोर्चेकरी दाखल झाले. महिलांची उपस्थिती पाहून आयोजकही स्तंभित झाले. या मोर्चात तब्बल तीन लाखांवर महिला सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलींनी निवेदन वाचून दाखविले, तेच निवेदन जिल्हा परिषदेचे अरुण विधळे यांना देण्यात आले. जिजाऊ वंदना करून या मोर्चाने महिला शक्तीलाच वंदन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>लातुरात विक्रमी गर्दी
लातूरच्या मोर्चाला समाजबांधवांची विक्रमी गर्दी होती. या मोर्चात अनेक माजी खासदार, माजी आमदार, आमदार, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्यांचे पदाधिकारी, सदस्य, वकील, डॉक्टर, इंजिनीअर, सरकारी नोकरदार, उद्योजक आणि शेतकरी सहभागी झाले. राजकीय नेते मोर्चात सर्वांत शेवटी होते.
>श्रद्धांजलीसाठी लक्षावधी लोक स्तब्ध
या मोर्चात कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी आणि उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Virat Darshan of Maratha Eki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.