विराट कोहलीची आॅडी स्वत:साठीच
By admin | Published: April 10, 2017 03:36 AM2017-04-10T03:36:56+5:302017-04-10T03:36:56+5:30
प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली याच्याकडून ५० लाखांमध्ये खरेदी केलेली आॅडी आर ८ ही कार मैत्रिणीसाठी नव्हे
जितेंद्र कालेकर / ठाणे
प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली याच्याकडून ५० लाखांमध्ये खरेदी केलेली आॅडी आर ८ ही कार मैत्रिणीसाठी नव्हे, तर स्वत:साठीच घेतली होती, असा दावा ठाण्याच्या कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ऊर्फ शॅगी ठक्कर याने पोलिसांकडे केला आहे. कॉल सेंटरमधून करोडो रुपये कमवले असले, तरी भागीदार आणि इतरांनी ते वाटून घेतल्यामुळे आपल्या वाट्याला अगदी तुटपुंजी रक्कम आल्याचेही त्याने चौकशीत सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना गुंगारा देणाऱ्या शॅगीला शनिवारी पहाटेच्या सुमारास ठाणे पोलिसांनी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. सुरुवातीला सराईत गुन्हेगाराप्रमाणे आपण त्या गावचेच नसल्याचा आव आणणाऱ्या शॅगीने आता थोडीथोडी माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सहावीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या बोरीवलीत, सातवी ते दहावी नालासोपाऱ्यात शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण मात्र अहमदाबाद येथे झाले. तिथेच रसायनशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या शॅगीला तंत्रज्ञानात मोठी आवड असल्यामुळे अहमदाबादमध्येच एका कॉल सेंटरमध्ये तो नोकरीला लागला. कॉल सेंटरमधील नोकरीतच अमेरिकन नागरिकांना गंडा कसा घातला जातो, याचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षणही त्याला मिळाले. यातूनच आपणही असाच ‘उद्योग’ सुरू करण्याची शक्कल त्याला सुचली. पुढे ठाण्याच्या मीरा रोड आणि काशिमीरा येथे काही मित्रांच्या मदतीने त्याने कॉल सेंटरचा डोलारा उभा केला. अमेरिकन नागरिकांना गंडा घातल्यानंतर १०० रुपयांपैकी त्यातील ६० रुपये हवालामार्फत मिळायचे. मग, कॉल सेंटरमधील १५० ते २०० कर्मचाऱ्यांचे पगार, वेगवेगळे भागीदार असल्यामुळे १० ते १५ कोटींची रक्कम मिळवूनही त्यातून तुटपुंजी रक्कम वाट्याला आल्याचा दावा आता शॅगीने केला आहे.
मार्केटमध्ये नवनवीन गाड्या आल्यानंतर त्या खरेदीची आवड असल्यानेच एका दलालामार्फत भारतीय क्रिकेट संघातील कर्णधार विराट कोहली याची अडीच कोटींची कार अवघ्या ५० लाखांमध्ये मिळाल्याने तीची खरेदी केली. मात्र, ती मैत्रिणीसाठी नव्हे तर स्वत:साठी खरेदी केली होती, असाही त्याने दावा केला आहे. त्याची ही आॅडी पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कुऱ्हाडे यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच हैदराबाद येथून जप्त केली.
या प्रकरणात शॅगी हा महत्त्वाचा आरोपी असल्यामुळे आणखी बरीच माहिती त्याच्याकडून मिळण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
तुटपुंजी रक्कम वाट्याला आली
अमेरिकन नागरिकांना गंडा घातल्यानंतर १०० रुपयांपैकी त्यातील ६० रुपये हवालामार्फत मिळायचे. मग, कॉल सेंटरमधील १५० ते २०० कर्मचाऱ्यांचे पगार, वेगवेगळे भागीदार असल्यामुळे १० ते १५ कोटींची रक्कम मिळवूनही त्यातून तुटपुंजी रक्कम वाट्याला आल्याचा दावा आता शॅगीने केला आहे.