विरेंद्र तावडे निर्दोष, सीबीआय खोटया प्रकरणात अडकवतेय - सनातन संस्था
By admin | Published: June 17, 2016 02:55 PM2016-06-17T14:55:20+5:302016-06-17T14:59:18+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक झालेला विरेंद्र तावडे निर्दोष असून, सीबीआय खोटे पुरावे सादर करुन तावडेंना अडकवत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक झालेला विरेंद्र तावडे निर्दोष असून, सीबीआय खोटे पुरावे सादर करुन तावडेंना अडकवत आहे असा आरोप सनातन संस्थेने केला आहे. सनातन संस्थेचे अभय वर्तक आणि संजीव पून्हाळेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन तावडे निर्दोष असल्याचा दावा केला.
विरेंद्र तावडेंविरोधात सीबीआयने ज्या संजय साडविलकर यांना साक्षीदार बनवले आहे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असे सनातनने म्हटले आहे. साडविलकरला कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरातील चांदीचा रथ बनवण्याचे कंत्राट मिळाले होते. त्यात त्याने कोटयावधीचा भ्रष्टाचार केला. २०१२ मध्ये तत्कालिन जिल्हाधिका-यांनी या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले. सनातन संस्था या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे असे अभय वर्तक म्हणाले.
तावडेंची मिडीया ट्रायल न होता न्यायालयीन प्रक्रियेनुसार खटल्याची सुनावणी झाली पाहिजे असे वर्तक म्हणाले. साडविलकरची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्याची मागणी त्यांनी केली.
सनातनने उपस्थित केलेले तीन मुद्दे
- संजय साडविलकरला दाभोलकर खटल्याबद्दल माहिती होते मग इतके दिवस तो गप्प का राहिला ?
- विरेंद्र तावडेंना ज्या ई-मेलवरुन सीबीआय दोषी ठरवत आहे. तो ई-मेल तावडेंना आला होता मात्र त्यांनी ई-मेलला कोणतेही उत्तर दिले नाही.
- या प्रकरणाचा तपास करणारे सीबीआय अधिकारी नंदकुमार नायर यांच्यावर बनावट कथानक रचले म्हणून केरळ उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते.