दाभोलकर हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडेच कटाचा सूत्रधार
By admin | Published: September 7, 2016 05:41 PM2016-09-07T17:41:25+5:302016-09-07T17:41:25+5:30
तावडे याने कट रचून विनय पवार आणि सारंग अकोलकर व इतरांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न झाले
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - सनातन संस्थेचा साधक विरेंद्रसिंह तावडे याने कट रचून विनय पवार आणि सारंग अकोलकर व इतरांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.
त्यासंबंधितचा कागदोपत्री व तोंडी पुरावा असल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवेपाटील यांच्या न्यायालयात सीबीआयचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस़ आऱ सिंह यांनी विरेंद्रसिंह तावडे याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सीबीआयने १ जून रोजी विरेंद्रसिंह तावडे याच्या पनवेल येथील घरी तसेच सनातन संस्थेच्या आश्रमावर छापा टाकला होता़ तसेच सारंग अकोलकर याच्या पुण्यातील घरावरही छापा टाकला होता. त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीवरुन सीबीआयने १० जून २०१६ ला तावडे याला अटक केली होती़ या खटल्यात तावडे याला न्यायालयीन कोठडी मिळाली असून सध्या कॉ़ गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या पोलीस कोठडी तो आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या २४ पानी आरोपपत्रात केलेल्या तपासात निष्पन्न झालेल्या बाबींचा गोषवारा देण्यात आला आहे़ कट रचणे आणि हत्या करणे असे आरोप विरेंद्रसिंह तावडे याच्यावर त्यात ठेवण्यात आले आहेत़ डॉ़ नरेंद्र दाभोलकर हे हिंदू धर्माविरुद्ध बोलतात़ हिंदू धर्मातील रुढी, परंपरा यांच्याविरुद्ध मोहीम चालवितात़ अंधश्रद्धा निर्मुलनाविषयी बोलतात़ संत लोकांविरुद्ध, देवाबद्दल अनुदगार काढतात़ चमत्काराला आव्हान देतात़ त्यांची हत्या करण्यामागे हा उद्देश असल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे.
विरेंद्र तावडे याने मुंबईतून एमबीबीएस केले असून २००१ पर्यंत कोल्हापूर येथे तो प्रॅक्टिस करीत होता़ सनातन संस्थेचे प्रमुख डॉ़ जयवंत आठवले यांच्या भाषणाने प्रभावीत होऊन १९९८ मध्ये तो सनातन संस्थेच्या संपर्कात आला़ कोल्हापूरात त्याने भाषणे देण्यास सुरुवात केली़ २००१ मध्ये त्याने डॉक्टरकी करणे थांबविले़ २००३ ला तो सनातन संस्थेचा समन्वयक म्हणून काम पाहू लागला़ हिंदू जनजागृती समितीशी त्याचा संपर्क झाला़ अंधश्रद्धा निर्मुलन बिल २००५ याबाबत डॉ़ दाभोलकर यांची कोल्हापूरमधील एक बैठकही त्याने इतरांच्या सहकार्याने उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता़ शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्याविरोधात २००४ मध्ये कॉ़ गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात मोर्चा काढण्यात आला होता़ त्याला विरोध करण्यासाठी तावडे याने विरोधी मोर्चा काढला होता़ त्यानंतर नवरात्रीच्या दरम्यान कोल्हापूर ख्रिश्चन फादर विजय फिली यांनी हिंदू महिलेचे धर्मपरिवर्तन केले होते़ या महिलेला पंचगंगेवर नेऊन तिला प्रार्थना करायला सांगितली होती़ तेव्हा तावडे याने तेथे जाऊन विरोध केला होता़ त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती़ २००६ पर्यंत तावडे हा वेगवेगळ्या मार्गाने कारवाई करीत होता.
डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांची २० आॅगस्ट २०१३ रोजी बालगंधर्व रंगमंदिराजवळ शिंदे पुलावर हत्या झाली़ त्यावेळी त्या परिसरात साफसफाईचे काम करणारे ६ साक्षीदार तपासात निष्पन्न झाले असून त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला व काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन दोघे जण जाताना पाहिल्याचे सांगितले आहे़ दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी वापरण्यात आलेल्या रिव्हॉल्व्हरचा बॅलेस्टिक अहवाल परदेशातून मागविण्यात आला असून तो आल्यानंतर तपास करायचा आहे़ तसेच फरार आरोपी व तावडे याच्या मोटारसायकलीचा तपास करायचा असल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. डॉ़ दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्यात पुणे शहर पोलीसांच्या गुन्हे शाखेने मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांना अटक केली होती़ ते सध्या जामीनावर असल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने ९ मे २०१५ रोजी या खटल्याचा तपास हाती घेतला आहे.
आरोपपत्रात सनातनची असंख्य कागदपत्रे
या आरोपपत्रासमवेत २० टिपणे सादर करण्यात आली होती़ त्यात आतापर्यंत घेतलेल्या विविध साक्षीदारांचे साक्षीपुरावे, सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेले संशयितांचे फोटो, रेखाचित्रे, विरेंद्रसिंह तावडे याच्या घरी व सनातन संस्थेवरील छाप्यात आढळून आलेली वेगवेगळी कागदपत्रे, सनातन वृत्तपत्राची अनेक बातम्यांची कात्रणे, विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे, दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मुलन समितीविषयी सनातनमध्ये छापण्यात आलेली व्यंगचित्रे यांचा समावेश आहे.