‘सनातन’चा वीरेंद्र तावडे एसआयटीकडे
By admin | Published: September 3, 2016 06:39 AM2016-09-03T06:39:04+5:302016-09-03T06:39:04+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या सनातन संस्थेच्या डॉ. वीरेंद्र तावडेचा ताबा कारागृह प्रशासनाने कोल्हापूर एसआयटीकडे
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या सनातन संस्थेच्या
डॉ. वीरेंद्र तावडेचा ताबा कारागृह प्रशासनाने कोल्हापूर एसआयटीकडे दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाची खातरजमा करून कारागृह प्रशासनाने तावडेला पोलिसांकडे सुपूर्द केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी तावडेला सीबीआयने पनवेलमधून अटक केली होती. त्याचे मडगाव बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी सारंग अकोलकर आणि रुद्रगौडा पाटील यांच्याशी असलेले संबंध या तपासादरम्यान समोर आले होते. त्याच्या लॅपटॉपमधून तसेच ई-मेलमधून महत्त्वाचा डाटा सीबीआयच्या हाती लागला होता. यासोबतच त्याच्या घरामधूनही बरीचशी कागदपत्रे सीबीआयने जप्त केली होती. सीबीआयची कोठडी संपल्यावर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्याच्याकडे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटीने त्याचा ताबा मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अर्जाला मान्यताही दिली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे एसआयटीने तावडेचा ताबा घेतला नव्हता. एसआयटीचे पथक गुरुवारी दुपारी पुण्यात दाखल झाले होते. तावडेचा ताबा घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशाची खातरजमा करून कारागृह प्रशासनाने दुपारी अडीचच्या सुमारास त्याला एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांचे पथक त्याला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झाल्याची माहिती येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी दिली.