वीरेंद्र तावडेच्या कोठडीत वाढ
By admin | Published: October 27, 2016 12:50 AM2016-10-27T00:50:30+5:302016-10-27T00:50:30+5:30
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याच्या न्यायालयीन कोठडीत ८ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याच्या न्यायालयीन कोठडीत ८ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. तावडे याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. या वेळी पोलिसांच्या विरोधात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर १६ नोव्हेंबरला निर्णय दिला जाईल, असे न्यायाधीश पाटील यांनी स्पष्ट केले.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडे याला पानसरे हत्या प्रकरणी ‘एसआयटी’ने अटक केली होती. त्याच्या पोलीस कोठडीच्या चौकशीमध्ये महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. तावडे सध्या येरवडा कारागृहात आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत बुधवारी संपली. न्यायालयाने त्याच्या कोठडीत चौदा दिवसांची वाढ केली.
दरम्यान, डॉ. तावडे ‘एसआयटी’च्या ताब्यात असताना अॅड. समीर पटवर्धन व वीरेंद्र इचलकरंजीकर यांना त्याची भेट घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती; परंतु पोलिसांनी या दोघांनाही भेट नाकारल्याने त्यांनी त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश पाटील यांनी १६ नोव्हेंबरला निकाल दिला जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)