आजपासून विरेश्वर छबिनोत्सव
By admin | Published: February 28, 2017 02:45 AM2017-02-28T02:45:54+5:302017-02-28T02:45:54+5:30
महाडकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विरेश्वर महाराजांचा छबिना आणि जत्रौत्सव मंगळवारी साजरा होणार आहे.
महाड : महाडकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विरेश्वर महाराजांचा छबिना आणि जत्रौत्सव मंगळवारी साजरा होणार आहे. या उत्सवाला लाखो भाविकांचा जनसागर लोटणार आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थान, प्रशासनाने तसेच नगरपरिषदेने जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे.
संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेल्या या छबिना उत्सवानिमित्त भरलेल्या यात्रेसाठी संपूर्ण मंदिर, गाडीतळ तसेच शिवाजी चौक व बाजारपेठेत दुकाने थाटण्यात आली आहेत. तसेच अनेक उंच आकाश पाळणे, आधुनिक मनोरंजनाची साधने या जत्रौत्सवात दिसून येत आहेत. मंगळवारी सायंकाळपासून तालुक्यातील विविध ग्रामदेवतांच्या पालख्या विरेश्वराच्या भेटीला वाजतगाजत येण्यास सुरुवात होणार आहे. या पालख्यांमध्ये विन्हेरे गावच्या झोलाई देवीचा मान महत्त्वाचा मानण्यात येतो. मध्यरात्री १ वा. च्या सुमारास ढोल नगाऱ्यांच्या निनादात झोलाई देवीचे शहरात आणि मंदिर परिसरात आगमन होते. (वार्ताहर)