परभणीत आक्रोश मोर्चाद्वारे अॅट्रॉसिटीला विराट समर्थन
By admin | Published: October 17, 2016 05:12 PM2016-10-17T17:12:16+5:302016-10-17T19:40:45+5:30
अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी परभणीत सोमवारी काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाद्वारे लाखोंच्या जनसमुदायाने एकतेचा संदेश दिला़
ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. १७ : अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी परभणीत सोमवारी काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाद्वारे लाखोंच्या जनसमुदायाने एकतेचा संदेश दिला़. दलित, बौद्ध, मुस्लीम, आदिवासी, ओबीसी अशा सर्वच घटकातील समाजबांधवांनी या मोर्चाद्वारे एकत्र येऊन अॅट्रॉसिटीचे जोरदार समर्थन केले़.
अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ सोमवारी परभणीत आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते़. सकाळी १० वाजेपासूनच शहरातील विविध मार्गांवरून निळे झेंडे हातात घेऊन समाजबांधव परभणीत दाखल होत होतो़. कोणी गाड्या करून तर कोणी रेल्वे, बस अशा जमेल त्या साधनाने परभणीमध्ये जत्थेच्या जत्थे दाखल होण्यास सुरुवात झाली़. शहरातील शनिवार बाजार भागातून हा मोर्चा निघणार असल्याने या ठिकाणी समाजबांधव एकत्र झाले़. मोर्चाच्या अनुषंगाने शहरातील सर्व रस्ते वाहुकीसाठी बंद करण्यात आले होते़. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला़.
शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला़. अग्रभागी विद्यार्थिनी त्यानंतर महिला त्यांच्या पाठीमागे युवक आणि सर्वात शेवटी स्वयंसेवक असे मोर्चाचे नियोजन केले होते़. साधारणत: दीड वाजण्याच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ महिला दाखल होण्यास प्रारंभ झाला़. लाखोंच्या संख्येने समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते़. महिला मोर्चा स्थळी पोहचल्या त्यावेळी युवकांची रांग शिवाजी चौकापर्यंत होती़. यावरून मोर्चातील गर्दी लक्षात येते़.
अॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ विविध घोषणा देत हातात फलक घेऊन मोर्चेकरी मोर्चात सहभागी झाले होते़. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात मोर्चेकरी दाखल झाले़. या ठिकाणी पाच विद्यार्थिनींची व अन्य काही मान्यवरांची भाषणे झाली़. त्यानंतर निवेदनाचे वाचन करण्यात आले़. विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून मोर्चाचा उद्देश स्पष्ट केला़ तसेच अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली़. विद्यार्थिनींची मनोगते सुरू असतानाच जय भीमचे नारे आणि डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदूमून गेला़.
लाखोंच्या संख्येने जनसमुदाय मोर्चात सहभागी झाला होता़. तरीही कुठेही शिस्तीचे उल्लंघन झाले नाही़. शांततेत आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या़. विशेष म्हणजे दुपारचे कडक ऊन असतानाही समाजबांधव एक ते दीड तास आंदोलनस्थळी बसून होते़. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांना विविध २२ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़. त्यात सुधारित अॅट्रॉसिटी अॅक्टची कडक अंमलबजावणी करावी, अॅट्रॉसिटी अॅक्टचा गैरवापर होत आहे, अशा वल्गना काही जण जाणीवपूर्वक करीत असून, दलित, मागासर्गीयांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत, याविरूद्ध सरकारने त्वरित पावले उचलून दलितांना संरक्षणाची हमी द्यावी, राज्यात प्रलंबित असलेले अॅट्रॉसिटी कायद्याचे खटले चालविण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करावी, अशा विविध मागण्यांचा यात समावेश आहे़. दुपारी १़१५ मिनिटांनी या मोर्चाला प्रारंभ झाला आणि साधारणत: २़५९ मिनिटांनी मोर्चाचा समारोप झाला़. समारोपानंतरही शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवातीला महिला आणि त्यानंतर युवक मोर्चा स्थळाहून बाहेर पडले़. यावेळी मोर्चातील स्वयंसेवकांनी शहरात कुठेही कचरा होणार नाही, याची काळजी घेतली़ ठिक ठिकाणी स्वयंसेवक कार्यरत असल्याचे पहावयास मिळाले़.
महिला, युवतींचा लक्षणीय सहभाग
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या आक्रोश मोर्चात महिला आणि युवतींचा लक्षणीय सहभाग होता़. तसेच डॉक्टर, वकील, प्राध्यापक, व्यावसायिक आदी विविध स्तरातील नागरिक या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते़. सोमवारच्या मोर्चाने परभणीत एकजुटीचा इतिहास घडविला़. मोर्चानंतर स्वंयसेवकांनी स्वच्छता अभियान राबविले.
हा प्रतिमोर्चा नाही
परभणीत काढण्यात आलेला आक्रोश मोर्चा हा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही़. दलित, मागासवर्गीय, मुस्लीम आदी बहुजन समाजबांधवांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे़. त्यामुळे हा प्रतिमोर्चा नाही, असे मोर्चातील संयोजकांनी यावेळी बोलताना सांगितले़. जवळपास ४ ते ५ लाखांचा जनसमुदाय मोर्चाला उपस्थित होता, असा संयोजकांनी दावा केला.