मक्केला न जाता मिळाले हज यात्रेचे पुण्य
By admin | Published: September 13, 2016 01:36 AM2016-09-13T01:36:16+5:302016-09-13T01:36:16+5:30
हज यात्रेला जाऊ शकत नाहीत त्यांनी अनाथांना मदत तसेच भरकटलेल्यांना सहारा देऊन मानवी दु:खे दूर करणारी सत्कृत्ये केल्यास त्यांना हज यात्रेचे पुण्य मिळते
पुणे : हज यात्रेला जाऊ शकत नाहीत त्यांनी अनाथांना मदत तसेच भरकटलेल्यांना सहारा देऊन मानवी दु:खे दूर करणारी सत्कृत्ये केल्यास त्यांना हज यात्रेचे पुण्य मिळते, असे म्हणतात. याचीच प्रचीती देत सकाळी मशिदीमध्ये इमाम म्हणून धर्मोपदेशाची जबाबदारी सांभाळून दुपारनंतर रिक्षा चालविणाऱ्या मोहंमद आरिफ सिद्दीकी यांनी दिली. सिद्दीकी यांच्या प्रसंगावधानामुळे नागपूर येथून घर सोडून आलेली १४ वर्षीय चिमुकली पुन्हा घरी परतली.
सिद्दीकी हे सकाळी दहाच्या सुमारास पुणे स्टेशनजवळ आले. त्या वेळी एक शाळकरी वाटणारी मुलगी रिक्षात बसली. वडीलधारे मागून येत असतील, असे समजून त्यांनी रिक्षा तशीच थांबवली. मुलीने सांगितले येरवड्याला जायचंय. आई-वडील कोठे आहेत का, असे विचारले असता तिने बरोबर नसल्याचे सांगितले. त्यांनी मुलीला पत्ता विचारला तेव्हा गोंधळलेल्या मुलीने अनाथाश्रमात रिक्षा घेण्यास सांगितले. मात्र येरवड्यात अनाथाश्रम नसल्याचे सिद्दीकी यांना माहिती होते. या वेळी त्यांना रिक्षा पंचायतीचे येरवडा प्रतिनिधी यासिन सय्यद भेटले. त्यांनी मुलीकडे विचारपूर केली असता तिने चुकीची माहिती देत त्यांना टाळले. त्यामुळे हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच या दोघांनी पर्णकुटी पोलीस चौकी गाठली. पोलिसांनी या मुलीची बॅग तपासली असता ती मुलगी नागपूरची असल्याचे समजले.
मिळालेल्या पत्त्यावरून जमदाडे यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क केला. तिथे तिच्या वडिलांनी हरविल्याची तक्रार नोंदविली होती. जमदाडे यांनी पुढील सोपस्कार पूर्ण करीत मुलीला पुण्याच्या बालनिरीक्षणगृहातून नागपूर पोलीस व तिच्या आई-वडिलांकडे मुलीला सोपवण्यात
आले. त्यामुळे ही मुलगी सुखरूप घरी पोहोचली. दरम्यान, सिद्दीकी यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले.
(प्रतिनिधी)