हजसाठीच्या व्हिसाचा तिढा सुटला

By admin | Published: August 3, 2016 05:28 AM2016-08-03T05:28:21+5:302016-08-03T05:28:21+5:30

हज यात्रेसाठी भारतातून जाणाऱ्या भाविकांचा व्हिसा मिळण्यात येत असलेली अडचण जवळपास दूर झाली

The visa for Haj was released | हजसाठीच्या व्हिसाचा तिढा सुटला

हजसाठीच्या व्हिसाचा तिढा सुटला

Next

जमीर काझी,

मुंबई- हज यात्रेसाठी भारतातून जाणाऱ्या भाविकांचा व्हिसा मिळण्यात येत असलेली अडचण जवळपास दूर झाली असून, सौदी अरेबियाने आजअखेर ५२ हजार यात्रेकरूंचे व्हिसा पाठविले आहेत. उर्वरित ५० टक्के व्हिसा येत्या आठवड्याभरात मिळणार असल्याने, हज कमिटी आॅफ इंडियाच्या वतीने बनविण्यात आलेल्या प्रवासाच्या नियोजित वेळापत्रकात कोणताही बदल करण्याची गरज नसल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.
हज कमिटी परराष्ट्र मंत्रालय आणि सौदीतील भारतीय दूतावासाने केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. त्यामुळे सौदी हज मंत्रालयाने सर्व व्हिसाची पूर्तता मुदतीमध्ये करण्याची ग्वाही दिली आहे. हजसाठी येत्या गुरुवारी देशभरातील पाच वेगवेगळ्या विमानतळांवरून दोन हजार ४२ भाविकांची पहिली तुकडी सौदी अरेबियाला रवाना होत आहे. ४ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत देशभरातील २० विमानतळांरून ३५७ विमानांचे सौदीसाठी उड्डाण होणार आहे.
राज्यातील हज यात्रेकरू २५ आॅगस्टपासून पाठविले जातील. राज्यातून ७ हजार ४०० भाविक कमिटीमार्फत यात्रेला जाणार आहेत. मुंबईतील पहिले विमान २७ आॅगस्टला रवाना होईल.
हज कमिटी इंडियामार्फत एक लाख २०, तर खासगी टुर्स कंपनीमार्फत ३६ हजार भाविक जाणार आहेत. मात्र, हज कमिटीकडून सर्व आवश्यक कागदपत्रे पाठविण्यात आली असताना, सौदी हज मंत्रालयाने या वर्षापासून व्हिसासाठी बनविलेल्या ‘ई-पाथ’ संगणकीय प्रणालीतील गोंधळामुळे ही समस्या निर्माण झाली होती. मात्र, हज कमिटीच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करत सर्व यात्रेकरूंचे व्हिसा मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
याबाबत उपमुख्य अधिकारी खालीद अरब म्हणाले, ‘सौदीच्या हज मंत्रालयाने या वर्षापासून बनविलेल्या ‘ई पाथ’ संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र, त्यासाठी हज कमिटीचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी व अन्य अधिकारी संपर्कात आहोत, तसेच परराष्ट्र मंत्रालयाने पाठपुरावा झाल्यामुळे व्हिसाची पूर्तता होत आहे. सौदीतील भारतीय दूतावासाने त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजाविली आहे.
>राजदूत अहमद जावेद यांची मोलाची भूमिका
हज यात्रेकरूंना व्हिसा मिळण्यात निर्माण झालेल्या अडचणींबाबतची माहिती ‘लोकमत’ने सौदीतील भारतीय राजदूत व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांना कळविली. ‘लोकमत’मध्ये आलेली वृत्तांची कात्रणे त्यांना पाठविली होती. त्यानंतर, जावेद यांनी २६ जुलैला अधिकाऱ्यांची बैठक घेत, सौदीच्या हज मंत्रालयाला सूचना दिल्या. मग त्यांच्याकडून युद्धपातळीवर कार्यवाही होत, ४० हजार व्हिसा पाठविण्यात आले. उर्वरित व्हिसा येत्या आठ दिवसांत पाठविले जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात रवाना होणाऱ्या सर्व यात्रेकरूंचे व्हिसा मिळाले आहेत. त्यामुळे पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे यात्रेकरूंना पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही.
- अताऊर रहिमान, मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी आॅफ इंडिया

Web Title: The visa for Haj was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.