भाषा सल्लागार समितीवर विष्णू सोळंके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:20 PM2018-12-31T14:20:02+5:302018-12-31T14:20:16+5:30
४१ सदस्यांची निवड : ५ आॅगस्टनंतर समितीची पुनर्रचना
अमरावती : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या भाषा सल्लागार समितीवर प्रसिद्ध कवी व साहित्यिक विष्णू सोळंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे यांच्यासह ३३ अशासकीय सदस्य व ८ शासकीय सदस्यांचा या समितीत समावेश आहे. विदर्भातील चार व्यक्तींचा या समितीत समावेश आहे.
शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा सक्षमपणे वापर व त्याकरिता विविध विषयांचे परिभाषा कोश तयार करण्याच्या उद्देशाने भाषा मंडळाची सन १९६१ मध्ये स्थापना करण्यात आली. प्रशासनिक वापरात भाषा संवर्धन व विकासासाठी भाषा सल्लागार समितीची वेळोवेळी पुनर्रचना करण्यात येते. मागील समितीची मुदत ५ आॅगस्ट रोजी संपुष्टात आल्याने या समितीची पुनर्रचना करण्यात आली. शासननिर्णयान्वये समितीवर अध्यक्षासह ३३ अशासकीय व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव संचालक दर्जाच्या ८ शासकीय सदस्यांची नियुक्ती यात करण्यात आली आहे.
राज्याच्या भाषा समितीवर अमरावतीच्या साहित्य वर्तुळात सातत्याने वावरणाऱ्या कवी विष्णू सोळंके यांना स्थान देण्यात आले आहे. शासनाच्या मराठी भाषा विभागाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती केली आहे. यात विदर्भातील प्रा. केशव सखाराम देशमुख, विवेक कवठेकर, प्रा. कुमार शास्त्री व विष्णू सोळंके यांचा समितीत समावेश आहे.