कोठडीतील मृत्यूप्रकरणी विश्वास नांगरे-पाटील यांचीही चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 09:20 AM2017-11-13T09:20:31+5:302017-11-13T09:20:44+5:30
दोषींची गय न करता त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
सांगली : पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालेली आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करण्यात येईल आणि दोषींची गय न करता त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. केसरकर यांनी अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांची रविवारी भेट घेतली.
सांगलीतील कोठडीत मृत्यू प्रकरणात मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ उसळा असून विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या बदलीची तर सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणात बोलताना केसरकर यांनी या दोघांचीही चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले. सर्व पक्षांतील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, आज सर्व पक्षीय सांगली बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
दोषींवर कारवाई झाली नाही तर आत्मदहन
अमानुष अशा पद्धतीने अनिकेतची हत्या पोलिसांनी पोलीस स्टेशन मधेच केली असल्याने आता पोलीस यंत्रणेवर विश्वासच उरलेला नाही. यातच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची यात चौकशी होणार असल्याने या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविला जावा, अशी मागणी कुटुंबीयांनी रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. याच बरोबर त्यांनी हत्येला जबाबदार असलेल्या सर्व दोषीवर जर योग्य कारवाई झाली नी तर आमचे कुटुंब पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करेल, असा इशारा अनिकेतच्या कुटुंबीयांनी दिला आहे.