‘व्हिजन डोंबिवली’ थंड बस्त्यात
By admin | Published: January 19, 2017 03:52 AM2017-01-19T03:52:58+5:302017-01-19T03:52:58+5:30
स्वच्छ व सुंदर डोंबिवलीसाठी शहरातील जाणकारांनी पुढाकार घेऊन ‘व्हिजन डोंबिवली’ हा उपक्रम हाती घेतला.
मुरलीधर भवार,
डोंबिवली- स्वच्छ व सुंदर डोंबिवलीसाठी शहरातील जाणकारांनी पुढाकार घेऊन ‘व्हिजन डोंबिवली’ हा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहा महिन्यांपूर्वी भेट घेतली. त्याच्या सूचनेनुसार हा २१ कलमी आराखडा त्यांच्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेस सादर केला. पण कोणीही त्याला प्रतिसादही दिलेला नाही. त्यामुळे स्मार्ट शहर करण्याच्या घोषणा देणाऱ्यांना शहर स्वच्छ-सुदंर करण्यात स्वारस्य उरले नसल्याची टीका या ‘व्हिजन’साठी पुढाकार घेणाऱ्यांनी केली.
या आराखड्यावर ना मुख्यमंत्री कार्यालयाने काही प्रतिसाद दिला, ना पालिकेने. त्यामुळे पालिकेला वगळून ‘व्हिजन डोंबिवली’चे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
डोंबिवलीतील प्रसिद्ध डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी स्वच्छ व सुंदर डोंबिवलीसाठी पुढाकार घेतला आणि त्या उपक्रमाला ‘व्हिजन डोंबिवली’ हे नाव दिले. या उपक्रमाचा शुभारंभ त्यांनी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये केला आणि २१ कलमी कार्यक्रम हाती घेतला आणि जूनमध्ये मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी हे व्हिजन समजून घेत त्याचा आराखडा मुख्यमंत्री कार्यलय आणि महापालिकेला सादर करण्यास सांगितले. त्यानंतर त्यावर बैठक घेण्याचे आश्वासन कोल्हटकर यांना दिले. त्याला सहा महिने उलटून गेले, तरी त्यावर अद्याप बैठक घेण्यास मुख्यमंत्र्यांनाही वेळ मिळालेला नाही. कोल्हटकर यांनी महापालिका व मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आराखड्यावर काहीही काम अद्याप सुरु झालेले नाही.
महापालिकेकडून प्रतिसाद मिळत नसला तरी कोल्हटकर यांनी त्यांचा उपक्रम पुढे सुरुच ठेवला आहे. ई-कचरा गोळा करण्यासाठी त्यांनी आजवर चार शिबीरे घेतली. त्यातून त्यांच्याकडे एक हजार किलो ई कचरा जमा झाला. तो त्यांनी एका कंपनीकडे प्रक्रियेसाठी सूपूर्द केला. ई-कचरा गोळा करण्याचे स्टेशन सुरु करण्यासाठी ‘व्हिजन डोंबिवली’ उपक्रमांतर्गत पालिका प्रशासनाकडे त्यांनी डोंबिवलीत जागा मागितली. पण पालिकेने ती देऊ केलेली नाही. प्लास्टिक मनी व कॅशलेशची संकल्पना अंमलात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोत्साहन देत असले, तरी कॅशलेशमुळे ईलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर वाढणार आहे.
भारतात ई कचऱ्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढीस लागले आहे. मोबाईलचा वापर वाढतो आहे. त्यातून ई-कचरा वाढतो आहे. त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे गरजेचे आहे, याकडे कोल्हटकर यांनी लक्ष वेधले.
>पालिकेची अनास्था
महापालिकेने घनकचरा प्रकल्प न उभारल्याचा याचिका राष्ट्रीय हरीत लवादाकडे आहे. ई-कचरा प्रक्रिया व प्लास्टिकच्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर केला, तर घनकचरा कमी होण्यास मदत मिळू शकते. परंतु त्याबाबतही पालिकेत असलेल्या अनास्थेबद्दल कोल्हटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
>प्लास्टिक प्रक्रियेवर देणार भर
२१ कलमी कार्यक्रमात त्यांनी ई-कचऱ्याला प्राधान्य दिले. त्याचबरोबर प्लास्टिकमुक्त शहरासाठी प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला आळा कसा घालता येईल, यासाठी शाळांमधून जनजागृती सुरु आहे.
या प्रकल्पातून नफा मिळविण्याचा उद्देश नसूनही पालिकेचा प्रतिसाद शून्य आहे. पालिकेनेही प्लास्टिकविरोधी मोहीम सुरु केली आहे.
तिला ‘व्हिजन डोंबिवली’ची जोड दिल्यास ती अधिक गतीमान व प्रभावी होऊ शकते, अशी आपेक्षा कोल्हटकर यांनी व्यक्त केली.
प्लास्टिकचा पुनर्वापर करुन त्यापासून डिझेल निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे. त्याला नवी मुंबईच्या कंपनीने प्रतिसाद दिला आहे.