परीक्षेवर भरारी पथकाची नजर
By admin | Published: February 28, 2017 02:37 AM2017-02-28T02:37:36+5:302017-02-28T02:37:36+5:30
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे
प्राची सोनवणे,
नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. ठाणे, मुंबई, रायगड विभागातील ५५७ केंद्रांवर ३ लाख ४० हजार ४०८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नियोजित परीक्षा केंद्रांवर कसलाही गैरप्रकार घडू नये, याकरिता दक्षता समितीसह भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, तसेच निरंतर शिक्षणाधिकारी आणि बोर्डाच्या पथकाचा समावेश करण्यात आला आहे.
मंगळवारी ११ ते २ या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे. परीक्षा कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये याकरिता प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तसेच परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी देखील बोर्डाचे कामकाज सुरू असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रविवारी पोलीस संरक्षणासह १४ गाड्यांमधून ठाणे, पालघर, रायगड केंद्रावर परीक्षेचे गोपनीय साहित्य पोहोचविण्यात आले तर सोमवारी १३ गाड्यांमधून मुंबई विभागातील सर्व केंद्रावर साहित्य सुरक्षितरीत्या पोहोचविण्यात आले. यावेळी केंद्रसंचालक तसेच परीरक्षकांना परीक्षा नियमांचे पालन, घ्यावयाची काळजी याविषयी सूचना करण्यात आल्या. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांशिवाय कोणालाही मोबाइलचा वापर करता येणार नसून, मोबाइल जमा करावे लागतील.
>आसनव्यवस्थेची खात्री करा
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडल्याने परीक्षा केंद्र आणि विद्यार्थी संख्येचे गणित अचूक जमविणे अडचणीचे ठरले. विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत व्हावी यादृष्टीने नजीकचे केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र काही केंद्रावर पुरेशी आसन व्यवस्था नसल्याने शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने शेजारील इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. विद्यार्थी तसेच पालकांनी गोंधळून न जाता वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सहसचिव सुभाष बोरसे यांनी केली आहे. शेजारील इमारतीत बैठक व्यवस्था करण्यात आलेल्या केंद्रांना फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्याचेही बोरसे यांनी सांगितले.
<शेवटच्या क्षणी ७१ अर्ज
गेल्या वर्षी परीक्षेत अयशस्वी ठरलेल्या, विषय न सुटलेल्या विद्यार्थ्यांना आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती. या संधीचा लाभ घेत ७३६ विद्यार्थ्यांनी दंडात्मक रक्कम भरून मुदतीनंतर अर्ज भरल्याची माहिती राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यामध्ये रिपिटर्स, श्रेणीसुधार तसेच तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार असून अतिविलंब, अतिविशेष, परीक्षा फी वसूल करून परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली असून या विद्यार्थ्यांना त्वरित हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले.