‘दृष्टिहीनाची आस, ब्रेलवाणीचा ध्यास’
By admin | Published: December 2, 2014 10:37 PM2014-12-02T22:37:15+5:302014-12-02T23:30:58+5:30
रेडिओ केंद्र सुरू : अंध शिक्षण संशोधकाचा डोळस प्रवास--अपंगदिनविशेष
चंद्रकांत कित्तुरे- कोल्हापूर --असे म्हणतात की, ज्याला देवाने शारीरिक व्यंग दिलेले असेल तर त्याची भरपाई अन्य कोणत्या तरी माध्यमातून केलेली असते. याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. फक्त त्यांना समाजाने हुरुप आणि बळ द्यायला हवे. सतीश नवले हा त्यातलाच एक अंध शिक्षण संशोधक. अंध असूनही डोळस माणसांपेक्षा अधिक तल्लख आणि हुशार. म्हणूनच त्याने भारतातील पहिला कम्युनिटी रेडिओ इन्चार्ज होण्याचा बहुमान मिळविला आहे. आता त्याची आस अन् ध्यास आहे, अंधांसाठी बे्रलवाणी एज्युकेशन रेडिओ केंद्र सुरू करण्याचा.
सतीश मूळचा पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरेचा. पुणे विद्यापीठात त्याने इतिहास विषयात एम. ए., तर शिक्षणशास्त्रमध्ये एम.एड्. डिस्टिक्शनमध्ये केले आहे. पुणे विद्यापीठाचे विद्यावाणी हे कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे. या केंद्रावर सर्वप्रथम काम करण्याची संधी त्याला मिळाली. तत्कालीन कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, पंडित विद्यासागर यांनी ती त्याला दिली. अंधांना शिकविण्याचा हा कार्यक्रम होता.
यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याने रेडिओ स्टेशन चालविण्यासाठी लागणारे तंत्र शिकून घेतले. हे शिकताना अंध असण्याचा त्याला फारसा अडसर आला नाही. उलट काही सॉफ्टवेअरच्या मदतीने त्याने अंधांना कसे शिकवायचे याचे तंत्र विकसित केले. स्क्रीन रीडरच्या साहाय्याने संगणक, मोबाईलही आॅपरेट करण्याचे तंत्रही तो शिकला.
शिक्षण घेत असतानाच तो ‘पे्ररणा असोसिएशन फॉर द ब्लार्इंड’ या संस्थेच्या संपर्कात आला. विद्यावाणी केंद्रावरून अंधांना शिकवू लागला. याचबरोबर वेगवेगळ्या प्रोजेक्टवरही काम करू लागला. ‘प्रेरणा’मधील अन्य सहकारीही त्याच्या मदतीला होते. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरवरील संजय दुधाणे यांच्या पुस्तकावर ‘ध्रुवतारा’ हे पहिले आॅडिओ बुक त्याच्या नेतृत्वाखालील आठजणांच्या टीमने तयार केले.
यासाठी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आणि पत्रकार सुनंदन लेले यांनीही त्याला मार्गदर्शन केले. या बुकच्या प्रकाशनाला दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकर आला होता. त्याने आपुलकीने माझी विचारपूस केली आणि कोणतीही मदत लागली तर केव्हाही हाक द्या. मदत करू, असे आश्वासन दिले. ही भेट अविस्मरणीय आणि अतिशय आनंददायी होती, असे सतीश सांगतो. आतापर्यंत तीनवेळा सचिनला भेटल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची एका कार्यक्रमात भेट झाली. त्यांनी सतीशचे गुण हेरले आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जालिहाळ बुद्रुक येथील येरळा प्रकल्प सोसायटीच्या येरळावाणी या कम्युनिटी रेडिओ स्टेशनची जबाबदारी स्वीकारशील का? अशी विचारणा केली.
संस्थेकडे शब्द टाकला आणि सतीश ‘येरळावाणी’चा इन्चार्ज झाला. एक जानेवारी २०१३ ते ३ मे २०१४ हा त्याचा येरळावाणीमधील कार्यकाल. प्रोग्रॅम्स तयार करणे, लाईव्ह आॅन एअर मुलाखती घेणे, फोन इन कार्यक्रम, मुलांच्या शिक्षणासाठीचे लाईव्ह कार्यक्रम करणे हे सर्व तो रेडिओ केंद्र चालविताना करीत असे. या काळात त्याने अनेकांच्या मुलाखती घेतल्या. १४व्या सिंचन परिषदेचे थेट प्रक्षेपण केल्याची आठवणही त्याने सांगितली.
मैत्री ते प्रेमविवाह
१२ मे २०१४ रोजी त्याला आयुष्याची जोडीदारीण लाभली. सीमा तिचे नाव. तीही अंध, पण कशातही कमी नाही. मूळची कोल्हापूरची. पुण्यात डी.एड्. करीत असताना तिची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमविवाहात झाले. कोल्हापुरातच युनियन बँकेच्या शाखेत प्रोबेशनरी आॅफिसर म्हणून ती नोकरी करते. जोडीदारासाठी सतीशनेही मग जालिहाळ सोडले आणि चार महिन्यांपासून तो कोल्हापुरात रहायला आला आहे.
ब्रेलवाणीची पूर्वतयारी
सध्या नाना पाटील हौसिंग सोसायटीमधील विकास हायस्कूलमधील अंध विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शन करीत आहे. याबरोबरच अंध शिक्षणासाठी स्वत:चेच ब्रेलवाणी एज्युकेशन रेडिओ केंद्र सुरू करण्याचा ध्यास घेतल्याचे तो सांगतो. त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी झाली आहे. यासाठी नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर, सुनंदन लेले, अविरत कणेरे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे त्याने सांगितले.
दिवाळी जवानांसमवेत
याशिवाय प्रवास करण्याचे भलतेच वेड सतीशला आहे. आतापर्यंत एकट्याने ५५ वेळा भारत भ्रमंती केल्याचे तो सांगतो. तो आणि त्याचे चार-पाच मित्र दरवर्षी दिवाळी सीमेवरील जवानांसोबत साजरी करतात. यंदाचे त्यांचे दहावे वर्ष होते. जम्मू-काश्मीरच्या हमिरपुरा, आखनूर सीमेवर यावर्षी आपण जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तेथून पाकिस्तानची सीमा ५०० पावलावर होती, असेही त्याने सांगितले.
अंध अपंगांनी ‘अप दीप भव’ या उक्तीप्रमाणे स्वत:च स्वत:चा प्रकाश व्हायला पाहिजे आणि समाजाने त्यांना साथ द्यायला पाहिजे, तरच अंध, अपंग स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगू शकतील
- सतीश नवले
अंध शिक्षण संशोधक
सतीशने दृष्टी नसतानाही ज्या पद्धतीने रेडिओ केंद्र चालविले. स्वकर्तृत्वाने जीवनात उभा राहिला आहे. ते पाहता तो अंधांसाठी आयकॉन ठरू शकेल.
- नारायण देशपांडे
सचिव, येरळा प्रोजेक्ट सोसायटी
एक दिवसाचे कौतुक नको
अंध, अपंगांचा केवळ एक दिवसाचा कौतुक सोहळा करून अपंगदिन साजरा केला जातो. असे न करता अंध, अपंगांना कायमस्वरूपी जगण्याचे बळ मिळावे अशा स्वरूपाचा आधार (मग ती नोकरी अथवा व्यवसाय ) समाजाकडून दिला जावा, अशी अपेक्षा त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.