नेत्रदानकर्त्या कुटुंबियांना अंध चेतनची सौर कंदीलाची भेट
By Admin | Published: November 1, 2016 12:50 PM2016-11-01T12:50:32+5:302016-11-01T12:50:32+5:30
अंध चेतन उचितकरने वाशीम तालुक्यातील माळेगाव येथील नेत्रदान केलेल्या वीस व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सौरदिव भेट दिले.
>ऑनलाइन लोकमत
वाशीम, दि. १ - पावली हा आनंद आणि प्रकाशाची उधळण करणारा प्रमुख सण. या सणानिमित्त सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असतांना अंध चेतन उचितकरने वाशीम तालुक्यातील माळेगाव येथील नेत्रदान केलेल्या वीस व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबातील मुलांना अभ्यास करण्यासाठी सौरदिवे भेट दिले.
तालुक्यातील माळेगाव हे एकमेव असे गाव आहे की जेथे कुणीही व्यक्ती मरण पावल्यास प्रथम त्या व्यक्तींचे नेत्रदान केले जाते. स्व. वल्सलाबाई भोयर यांच्या रुपाने २००९ मध्ये पहिले नेत्रदान या गावातून झाले. त्यानंतर आजतागायत मृत्यू पावलेल्या वीस लोकांचेही नेत्रदान गावक-यांनी घडवून आणले. स्व. गजानन चौधरी यांचे याच महिन्यात विसावे नेत्रदान झाले. अंध चेतन उचितकर हा जिल्हयाच्या नेत्रदान चळवळीचा नेत्रदूत असल्याने त्याने माळेगावची दखल घेऊन दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या दिवशी होणारा सौर लाईटचे वितरण कार्यक्रम माळेगावात घेण्याचे ठरवून दिवाळीच्या दिवशी सकाळी माळेगावात जाऊन नेत्रदान केलेलेल्या कुटुंबियांचे सांत्वन करुन त्यांच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी सौर दिव्यांचे वाटप केले.