पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांची ताजबाग दर्गा व दीक्षाभूमीला भेट
By admin | Published: June 2, 2016 10:18 PM2016-06-02T22:18:14+5:302016-06-02T22:18:14+5:30
नाते घट्ट करण्यासाठी प्रेम वाटणे आवश्यक आहे. यामुळे संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता रहात नाही, असे मत पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 2 - नाते घट्ट करण्यासाठी प्रेम वाटणे आवश्यक आहे. यामुळे संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता रहात नाही, असे मत पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले. अब्दुल बासित सध्या नागपुरात असून त्यांनी गुरुवारी ताजबाग दर्गा, दीक्षाभूमी व झिरो माईलला भेट दिली. दरम्यान, त्यांनी काहीवेळ पत्रकारांशी संवाद साधला.
भारत व पाकिस्तानमधील कटूता जगजाहीर आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रेम वाटण्याची भूमिका मांडल्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. नागपुरातील ताजबाग दर्गा व पाकिस्तानातील दर्ग्यांमध्ये काहीच फरक नाही. नागपूर फारच सुंदर शहर असून येथील नागरिक आदरातिथ्यप्रिय आहेत. त्यांच्याकडून फार प्रेम मिळत आहे असेही बासित यांनी सांगितले.
बासित यांनी सर्वप्रथम दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांना दीक्षाभूमीच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. दीक्षाभूमी समितीने त्यांचा सत्कारही केला. यानंतर ते देशाचे केंद्रस्थान असलेल्या झिरो माईल येथे पोहोचले. त्यांना झिरो माईलची विस्तृत माहिती देण्यात आली. येथून ते सायंकाळी ६.२० च्या सुमारास ताजबाग दर्गा येथे गेले. दर्ग्यात त्यांनी ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष शेख हुसैन व सचिव इकबाल वेलची यांच्यासोबत फातिहा पठण केले व दोन्ही देशांत शांती नांदण्याची प्रार्थना केली. मोठ्या मसिदीमध्ये त्यांनी नमाज पठण केले. या ठिकाणी त्यांनी किमान एक तास घालवला. दरम्यान, त्यांना हजरत बाबा ताजुद्दीन यांच्यासंदर्भात माहिती देण्यात आली.