पवार-मुख्यमंत्री भेट
By admin | Published: October 3, 2016 05:07 AM2016-10-03T05:07:02+5:302016-10-03T05:07:02+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून उभय भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून उभय भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. सह्याद्री अतिथीगृहावर शनिवारी झालेल्या या भेटीचा अधिकृत तपशील बाहेर आला नसला तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी झालेल्या या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याचे कळते. राज्यात ठिकठिकाणी निघत असलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चांनी राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. दिवाळीनंतर मुंबईतही विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. तोपर्यंत आरक्षणाच्या निर्णयावर तोडगा निघावा असा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या भेटी घेऊन मराठा मोर्चांसंदर्भात माहिती दिल्याचे समजते. त्याचवेळी शरद पवार यांच्या भेटीची वेळ ठरविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यास सरकार तयार आहे, परंतु चर्चेसाठी कुणीही पुढे येत नसल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच सांगितले आहे. तर आम्ही आमच्या मागण्या प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिलेल्या आहेत. चर्चेची गरज नाही, चेंडू सरकारच्या कोर्टात आहे, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर १३ आॅक्टोबरला सुनावणी होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
>चर्चेची गरज नाही, चेंडू सरकारच्या कोर्टात !
मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यास सरकार तयार आहे, परंतु चर्चेसाठी कुणीही पुढे येत नसल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच सांगितले आहे. आम्ही आमच्या मागण्या प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिलेल्या आहेत. चर्चेची गरज नाही, चेंडू सरकारच्या कोर्टात आहे, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.