औरंगाबाद नागपूर हायस्पीड ट्रेनसाठी स्पेनच्या तज्ज्ञांची औरंगाबादला भेट
By Admin | Published: March 10, 2016 06:59 PM2016-03-10T18:59:54+5:302016-03-10T19:22:27+5:30
औरंगाबाद ते नागपूर या मार्गावर हायस्पीड रेल्वे ट्रेनचे नेटवर्क उभारता येईल का यासाठी स्पेनमधल्या तज्ज्ञ पथकानं पाहणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 10 - भारतीय रेल्वे आणि स्पेन रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडोर हा प्रकल्प हाती घेण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या दृष्टीने स्पेनच्या चार सदस्यीय पथकाने गुरुवारी मॉडेल रेल्वेस्टेशनची पाहणी केली. या कॉरिडोरमध्ये औरंगाबादचा समावेश होण्यास सर्व बाबी अनुकूल असल्याचे संकेत या पथकाने दिले आहेत.
त्यामुळे आगामी काही वर्षात औरंगाबादमार्गे ताशी २०० कि.मी. वेगाने हायस्पीड ट्रेन धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे औरंगाबादहून नागपूर आणि मुंबई अवघ्या १ तास ४० मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.
भारतीय रेल्वे आणि स्पेन रेल्वे यांच्या वतीने मुंबई-कोलकाता हायस्पीड कॉरिडोर रेल्वे मार्ग उभारण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडोर केला जाणार आहे. या दोन्ही शहरांदरम्यान हायस्पीड रेल्वे चालविता येऊ शकते का ? याची चाचपणी आणि सर्वेक्षण स्पेनच्या पथकाकडून सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत या पथकाने मुंबई, ठाणे, नाशिक, आकोला, जळगाव, भुसावळ रेल्वेस्टेशनची पाहणी केली.
मुंबई ते नागपूर ३ तासात
औरंगाबादहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वेने जाण्यासाठी सध्या किमान ६ तास लागतात. परंतु या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर अवघ्या १ तास ४० मिनिटात मुंबई गाठणे शक्य होईल. शिवाय नागपूरही अवघ्या काही तासात गाठता येईल. तर मुंबई ते नागपूर हे अंतर ३ तासात कापणे शक्य होईल,अशा विश्वास पथकाने व्यक्त केला. हा प्रकल्प उभारताना पर्यटक, रस्त्यांवरील अपघात कमी होणे, प्रवासातील सुरक्षितात अशा विविध बाबींना महत्व देण्यात येत आहे.
असा राहणार मार्ग
पहिल्या टप्प्यातील मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडोरचा मार्ग मुंबई-भोईसर-नाशिक-औरंगाबाद-भुसावळ-आकोला-अमरावती-नागपूरअसा राहणार आहे.