व्हिजिट महाराष्ट्र : पर्यटन वर्षाचा दिल्लीत शुभारंभ
By admin | Published: January 31, 2016 12:32 AM2016-01-31T00:32:39+5:302016-01-31T00:32:39+5:30
महाराष्ट्र सरकारने २0१६-१७ ‘व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. समस्त दिल्लीकर जनतेने व देशातील पर्यटकांनी गड, किल्ले, समुद्र किनारे, पर्यटन स्थळे पाहण्यासाठी
नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने २0१६-१७ ‘व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. समस्त दिल्लीकर जनतेने व देशातील पर्यटकांनी गड, किल्ले, समुद्र किनारे, पर्यटन स्थळे पाहण्यासाठी या वर्षात महाराष्ट्राला अवश्य भेट द्यावी, असे खुले निमंत्रण दिल्ली हाट येथील महाजत्रा महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. त्यांच्या हस्ते ‘व्हिजिट महाराष्ट्र’ वर्षाचा अधिकृत शुभारंभ झाला.
महाराष्ट्राची हस्तकला, लघु उद्योग, कुटीराद्योग व मराठी संस्कृतीच्या महतीचे दर्शन घडवणारा महाराष्ट्र ‘महाजत्रा’ महोत्सव १५ दिवसांपासून दिल्ली हाट येथे सुरू होता. शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्याच समारोप झाला. देशातील अग्रणी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. दिल्लीत महाजत्रा महोत्सवाचे आयोजन करून राज्याच्या विविध भागांतील हस्तकला, लघु व कुटीरोद्योग तसेच वैविध्यपूर्ण लोकसंस्कृतीचे दर्शन दिल्लीकरांना व अन्य पर्यटकांना झाले, याबद्दल सरकारच्या विविध विभागांचे कौतुक केले.
पुरणपोळीचे मार्केटिंग करणार
महाराष्ट्राची पुरणपोळी, वडापाव व अन्य लोकप्रिय खाद्यपदार्थांचे जगभर मार्केटिंग करू, असा संकल्प व्यक्त करीत राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या सचिव वळसा नायर म्हणाल्या, दिल्ली हाटच्या महाजत्रेला दिल्लीसह देश विदेशातल्या पर्यटकांचा अपूर्व प्रतिसाद मिळाला.
या सोहळयात कलादिग्दर्शक नितीन देसाई, पैठणीचा प्रसार आणि प्रचार करणारे राजपूत, सुती वॉल हँगिंग्ज बनवणारे जीतेंद्र राजपूत, राजेंद्र अनकम, अरोमा थेरपीच्या पुरस्कर्त्या विजया, पर्यटकांना महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थांची ओळख करून देणाऱ्या शुभांगी चिपळूणकर, प्रदर्शनातील अन्य प्रतिनिधी व मुंबईतील सांस्कृतिक कार्यक्रमाचे पथक प्रमुख आदींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)