पाहुणी म्हणून आलेली आई निष्ठूर बनून गेली !
By admin | Published: July 26, 2016 10:47 PM2016-07-26T22:47:07+5:302016-07-26T22:47:07+5:30
रक्ताची माणसं नाती विसरतात, तेव्हा समाजातील माणसं ती जोडतात.
अजय जाधव/ऑनलाइन लोकमत
उंब्रज ( सातारा ), दि. 26 - रक्ताची माणसं नाती विसरतात, तेव्हा समाजातील माणसं ती जोडतात. माणुसकी संपत चाललीय अशी ओरड होत असतानाच हे खोटं ठरविणारी घटना उंब्रजमध्ये घडली. पाहुणी म्हणून आलेली आई पोटच्या गोळ्याला सोडून गेली. तेव्हा तिचा शोभा कांबळे यांनी माँ बनून सांभाळ केला.
याबाबत माहिती अशी की, येथील बाजारपेठेत शोभा कांबळे या अनेक वर्षांपासून केळी विक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवार १४ रोजी त्या नेहमीप्रमाणे केळी विकत असताना सायंकाळी सातच्या सुमारास भुकेने व्याकूळ झालेली एक महिला दोन वर्षांच्या मुलासह शोभा यांच्याकडे आली. ती स्वत:चं नाव कोमल शिंदे असे सांगत होती. तर मुलाचं नाव यश असल्याचे सांगितले.
खूप भूक लागलीय, आम्ही दोघं उपाशी आहोत, असे ती म्हणू लागली. शोभा यांना तिचा कळवळा आला. पोराकडे बघितलं तर ते पण हसलं. शोभा यांनी टोपलीतील केळी मायलेकरांना खायला दिली. तेव्हा तिने शोभा यांच्याकडे मदत मागितली. ती म्हणाली, मी गुलबर्गाची. मला कोणच नाही. मला जगण्यासाठी मदत कराल का ?. त्यावर शोभा कांबळे यांनी विश्वास ठेवला. त्यांनी कोमलसह यशला घरी आणले. जेवण केले, यशसाठी खेळणी, कपडे आणली. ही माहिती समजल्यावर शेजारी राहत असलेल्या वैशाली कांबळे तेथे आल्या. त्यांना पाहिल्यानंतर यशने माँ म्हणून झेप घेतली. शोभा आणि वैशाली यांनी यशला लळा लावला. यश तक्षशिलानगरमध्ये बागडू लागला. अनेक जण त्याला माया लावू लागले.
पण दोन दिवसांनी पहाटे यशला शोभा यांच्या घरात ठेवून कोमल फरार झाली. शोभा यांनीही जास्त वेळ न घालवता पोलिस ठाणे गाठले. त्यावर हवालदार शिवाजी जगताप यांनी घाईत निर्णय न घेता 'कोमल परत येते का ?' हे पाहण्याचा निर्णय घेतला. ही घटना सहायक पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांना सांगितली; पण कोमल परत आलीच नाही. यशला मंगळवारी सातारा येथील बाल सुधारगृहात हलविण्यात आले. त्यानंतर म्हसवडच्या बालसंगोपनगृहात रवानगी करण्यात आली.