CoronaVirus: कोरोना गुणाकार करण्याची शक्यता, पुढील १५ दिवस महत्त्वाचे- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 09:08 PM2020-03-27T21:08:42+5:302020-03-27T21:29:06+5:30
Coronavirus कोरोना घराबाहेर आहे, त्यामुळे घरातच राहा; मुख्यमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन
मुंबई: कोरोनाचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला असून पुढील १५ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे घरीच राहा, अनावश्यक गर्दी टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय अतिशय धाडसी आहे. मात्र तुमच्यावर विश्वास ठेऊन मी हा निर्णय घेतला आहे, असंदेखील मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनाचा अतिशय महत्त्वाचा टप्पा सुरू झाला असून येत्या काही दिवसांत कोरोना गुणाकार करण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळातही आपण अन्नधान्याची दुकानं २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तुमच्यावर विश्वास दाखवून घेतला आहे. गर्दी टाळण्याच्या हेतूनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळे कृपया दुकानांमध्ये गर्दी करू नका, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं.
मला माहिती आहे की आपल्यामध्ये आणि सरकारमध्ये एक विश्वासाचं नातं आहे हे मी पहिल्या दिवसापासून बोलतोय. रस्त्यावरची गर्दी सुद्धा बरीच कमी झाली आहे. ज्या सूचना तुम्हाला दिल्या जातात, तुम्ही काटेकोरपणे पाळत आहात.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 27, 2020
परराज्यातून आलेले काही जण त्यांच्या गावाला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहतूक बंद असल्यानं ते जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. परराज्यातून आलेल्यांनी धोकादायक प्रवास करू नये. त्यांनी इथंच थांबावं. राज्य सरकार त्यांची काळजी घेईल. कारण हीच आपली संस्कृती आहे. माणूस जगवायचा आहे. त्यासाठी माणुसकी जपायलाच हवी, असंदेखील मुख्यमंत्री म्हणाले.
"जीवनावश्यक वस्तूंची दुकाने म्हणजे औषधे, अन्नधान्य हे २४ तास उघडी राहतील."
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 27, 2020
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
“Shops offering essential commodities like medicines, food grains etc will remain open 24 hours.”
- CM Uddhav Balasaheb Thackeray
कोरोनाची लक्षणं दिसल्यास तातडीनं रुग्णालयात जा. वेळेवर उपचार घेतल्यास कोरोना बरा होतो. कोरोनाचा संसर्ग झालेले अनेक जण ठणठणीत बरे झाले असून त्यांच्या घरी परतले आहेत. त्यामुळे चिंता करू नका, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. कोरोनाचा विषाणू तुमच्या घराबाहेर आहे. तुमच्या घरात नाही. त्यामुळे तुम्ही घरात सुरक्षित आहात. घराबाहेर पडू नका. परिस्थिती आव्हानात्मक आहे. तुम्ही सकारात्मक राहा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.