विठोबा कोणा एकाचं दैवत नाही, तो सर्व समाजाचा; कीर्तनकार मुस्लिम महिलेचे होते अखेरचे उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 08:23 AM2024-06-29T08:23:04+5:302024-06-29T08:23:39+5:30
लहानपणापासून केलेल्या विठ्ठलभक्तीने थकलेल्या त्यांच्या देहाने प्रतिसाद दिला नाही.
राजू इनामदार
पुणे : ‘‘विठोबा कोणा एकाचे दैवत नाही. तो सर्व समाजाचा आहे. त्याची सेवा करण्यात मला आनंद मिळतो. शरीर साथ देत आहे तोपर्यंत मी त्याची सेवा करतच राहणार...” हे उद्गार आहेत ज्येष्ठ कीर्तनकार जैतूनबी यांचे. वय वर्षे ७७ असलेल्या जैतूनबी यांनी ६ जुलै २०१०च्या रात्री कीर्तन केले. त्याच रात्री त्यांची प्राणज्योत मालवली आणि ते कीर्तन त्यांचे अखेरचे ठरले.
कार्यक्रमाचे स्थळ होते पुण्यातील रामोशी गेट पोलिस चौकी. काळ होता पंढरीच्या वारीचा आणि वेळ होती रात्रीची. उपस्थित वारकऱ्यांनी त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लहानपणापासून केलेल्या विठ्ठलभक्तीने थकलेल्या त्यांच्या देहाने प्रतिसाद दिला
नाही.
५व्या वर्षी वारकरी संप्रदायाची दीक्षा
माळेगाव (ता. बारामती) या आपल्या मूळच्या गावातून नेहमीप्रमाणे त्या गावातील दिंडीबरोबर पुण्यात आल्या होत्या. वयाच्या ५व्या वर्षी त्यांना माळेगावमधील हनुमानदास महाराज यांनी वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांचे वडील मकबूलभाई सय्यद हे गवंडी काम करत. संध्याकाळी दमलेल्या शरीराला विसावा म्हणून हनुमान महाराज यांच्या भजनाला जाऊन बसत. बरोबर लहानगी जैतूनबी असे. दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. आजन्म ब्रह्मचारी व व्रतस्थ राहिल्या. विठ्ठलभक्ती हाच त्यांचा अखेरपर्यंतचा ध्यास होता.
जैतूनबी यांना प्रत्यक्ष पाहिलेले, त्यांच्याबरोबर बोललेले ८७ वर्षीय नंदकुमार लांडगे सांगत होते. संत गाडगे महाराज ज्याप्रमाणे प्रश्नोत्तरे घेत कीर्तन करत, त्याप्रमाणे जैतूनबी कीर्तन करत. त्या श्रोत्यांना प्रश्न करत, त्यांच्याकडून उत्तरे घेत.