विठ्ठला, शेतकरी कर्जमुक्त होऊ दे ! मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे
By admin | Published: July 4, 2017 05:59 AM2017-07-04T05:59:11+5:302017-07-04T18:42:48+5:30
देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे, बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे ! असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री
प्रभू पुजारी/ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 4 - देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे, बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे ! असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाकडे घातले.
४ जुलै रोजी पहाटे २़२० वाजता आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा परसराम उत्तमराम मेरत व त्यांच्या पत्नी अनुसया मेरत यांना मिळाला.
शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मानाच्या वारकऱ्यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, शाल, साडी आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा वर्षभरातचा मोफत पास व १५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले, गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रवीण दराडे, शकुंतला नडगिरे, उल्हास पवार, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस प्रमुख एस़ वीरेश प्रभू, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, गायिका अनुराधा पौडवाल आदी उपस्थित होते़
मुख्यमंत्री म्हणाले, आळंदी ते पंढरी आणि देहू ते पंढरी पायी वारी म्हणजे सुख देणारा सोहळा असतो़ वारकरी मजल दर मजल करीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी ओढीने झपाझप पाय टाकत पंढरीला येतात. भक्तीभावाने प्रेरित झालेली ही वारी असते़ भारत-कॅनडा मैत्रीचा करार झाला असून त्यांनी स्वत:हून पंढरपूरच्या विकासाला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे़ त्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यास पंढरीचा नक्कीच विकास होईल. याबाबचा प्रस्ताव त्यांच्याकडूनच आल्याने पंढरीचा महिमा आता परदेशातही झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३० जूनपर्यंत मंदिर समितीची स्थापना करण्यात आली आहे़ परंतु या समितीत केवळ दोनच वारकऱ्यांचा समावेश आहे़ त्यामुळे ही समिती बरखास्त करण्याची मागणी वारकरी संघटनेने केली आहे, मात्र ही समिती पूर्ण झाली नसून उर्वरित जागांमध्ये वारकऱ्यांचा नक्कीच समावेश केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले़
निर्मल वारी यशस्वी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे अभिनंदन केले़ फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाबाबत भरीव आश्वासन दिले़ शिवाय नमामी चंद्रभागा हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी आणि चंद्रभागा प्रदूषणमुक्त होण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.